आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानरचनावादी बागेत खेळातून शिक्षण:चाकोरीबाहेर पडून शिक्षण सोपे हाेण्यासाठी शिक्षकांची धडपड

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण प्रक्रिया किंवा मानवी जीवनात कितीही बदल झाले तरी देशाचे भविष्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. व्यक्ती, समाज आणि पर्यायाने राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे चाकोरी पलीकडे जाऊन अध्ययन- अध्यापनात बदल घडवून शिक्षक शिक्षण सोपं करीत आहेत. जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केलेल्या शिक्षकांच्या कार्याचा शिक्षकदिनी घेतलेला आढावा.

ज्ञानरचनावादी बागेत खेळातून शिक्षण
जि. प. प्राथमिक शाळा, निंबी बुद्रूक (ता. बार्शीटाकळी) या शाळेतील शिक्षक देवेंद्र विजय खंडारे यांनी कोविड काळात विविध उपक्रम राबवून शाळेला वेगळी ओळख मिळवून दिली. चार सहकारी शिक्षकांनी मिळून दोन लाख जमा करून शाळेची रंगरंगोटी केली, दीड एकर परिसरातला कुंपण, गेट करून घेतले. शैक्षणिक उपक्रमांत सोशल मीडियावर चॅनल सुरू केले. इंग्लिश लॅब ही संकल्पना राबवली जात आहे. खासगी कॉन्व्हेंन्टप्रमाणे विविध उपक्रम याद्वारे राबवले जातात. विद्यार्थ्यांना खेळातून शिकता यावे, यासाठी ज्ञानरचनावादी बाग तयार करून स्वयंम अध्ययनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. या विविध उपक्रमांची दखल घेऊन शाळेला जिल्हा,विभाग स्तरावर गौरवले. यात श्री. खंडारे, सहकारी शिक्षकांचा वाटा आहे.

फाइव्ह स्टार वाचनालय, वर्ड बँकेने गोडी
जिल्हा परिषद शाळा खेर्डा, बुद्रूक ता. बार्शीटाकळी येथे कीर्तीमाला श्रीकृष्ण राऊत या शिक्षिका अनोख्या संकल्पना राबवतात. पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी फाइव्ह स्टार वाचनालय सुरू केले. यात मुलांचे वाचन घेऊन त्यांना स्टार रेटिंग दिले जाते. त्याची नोंद ठेवली जाते. त्यामुळे दुसरीतील मुले कठीण शब्द वाचायला लागली. अंकगणितात संख्यांची घर पाडून त्या शिकवतात. कोटी, दसकोटीपर्यंतच्या संख्या मुले ओळखतात. इंग्रजीची वर्ड बँक सुरू केली. पाठ झालेला शब्द मुले या बँकेत टाकतात. ठरलेल्या तारखेला बँक उघडते. ज्याचे जास्त शब्द असतील, तो त्या महिन्याचा विजेता ठरतो. यामुळे पहिली, दुसरीच्या मुलांचे दोनशे ते अडिचशे शब्द पाठ आहेत.

वाचन संस्कृती रूजवण्यासाठी ‘पुस्तक मित्र’
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा राजूरा घाटे येथील शिक्षक मनोज लेखणार यांनी कोरोना काळात ‘पुस्तक मित्र’ उपक्रम सुरू केला. शाळेकडून मुलांसाठी ३०० पुस्तक दिली. आठ विद्यार्थ्यांत तीस पुस्तक वाटले. ही मुलं ग्रंथपालाचे काम करतात. मुलांना पुस्तक देणे, परत मागवणे, आवडलेल्या पुस्तकावर चर्चाही केली जाते. वाचलेल्या पुस्तकावर चार ओळीत टिपण लिहून ऑनलाइन ग्रुपवर टाकणे आवश्यक आहे. यांचा हा प्रयोग विद्यार्थ्यांत लोकप्रिय ठरला. अजूनही त्यांचा उपक्रम उत्साहात सुरू आहे. याचे फलित म्हणजे फावल्या वेळात या गावातील मुलांच्या हातात मोबाइल ऐवजी पुस्तक असते.

‘एनएमएमएस’मध्ये विद्यार्थिनींचे यश
शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. पण मनापासून प्रयत्न केल्यास जिल्हा परिषद शाळांतूनही गुणवंत घडू शकतात, हे खैरखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील दहा पैकी सात विद्यार्थिनींनी एन.एम.एम.एस.परीक्षेत यश प्राप्त करून दाखवले. या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक विजय हरणे देवदूत बनून अवतरले. या परीक्षेची तयारी करून घेताना त्यांनी काही मुलींना सायकल, मोबाइलची मदत करून त्यांचा अभ्यास करून घेतला. ज्यादा वर्ग घेऊन मार्गदर्शन केले. या कामांमध्ये त्यांना मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांनी मदत केली. या सर्व मुलींच्या शिक्षणाच्या वाटा विजय हरणे यांच्यामुळे सुकर झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...