आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वच्छ परिसर:सुपर दिरंगाई, अनास्थेची स्पेशालिटी; गवताळ, अस्वच्छ परिसर, बंद उपकरणे

अकोला16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंद इमारतीची गंजलेली कुलुपे, दर्शनी भाग वगळता इतरत्र विखुरलेला कचरा आणि फरशांचे तुकडे, कधीकाळी आणून ठेवलेली व सध्या सुकून गेलेली शोभीवंत रोपे अशा स्थितीत बहुप्रतिक्षित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग सोमवारी, १ ऑगस्टला सुरू झाला. दर्शनी भागातील नोंदणी विभागात तीन ते चार कर्मचारी उपस्थित होते. भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. दरम्यान ‘जिल्हाधिकारी यांनी सुपर स्पेशालिटी सुरू करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय हा अत्यंत घाईचा आहे, असे सांगत भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी नाराजी व्यक्त केली.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून महागडी वैद्यकीय उपकरणे आणून सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधून तयार झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. कोविड काळात हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल होणे गरजेचे होते. मात्र प्रशासनाने ‘तारीख पे तारीख’ देत वेळ गमावला. अद्यापही तंत्रज्ञ आणि मनुष्यबळाअभावी सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्णपणे सुरू होऊ शकले नाही. ७ जुलैला जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक घेऊन हे रुग्णालय सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्रीचा विचार करता व भविष्यात टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ प्राप्त होईपर्यंत या रुग्णालयात मर्यादित सुविधा देण्यास सुरुवात करावी, यासंदर्भात जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी २८ तारखेला निर्देश दिले होते. त्यानुसार १ ऑगस्टला येथील ओपीडी सुरू झाली. ओपीडी सुरू होणार असल्याने रुग्णालयाच्या दर्शनी भागात तेवढी साफसफाई करण्यात आली होती. मात्र रुग्णालयामागील आणि आजूबाजूच्या परिसरात कचरा, फरशांचे तुकडे विखुरलेले होते. देखरेख आणि स्वच्छतेअभावी रुग्णालयाच्या आवारातील शोभीवंत झाडे सुकत आहेत. इमारतींची कुलूपे गंजली आहेत. आवारात गवत वाढत आहे. अशा अवस्थेत ओपीडी सुरू झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घाई करण्याची गरज नव्हती : आमदार रणधीर सावरकर
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आमदार रणधीर सावरकर आणि पदाधिकाऱ्यांनी पुष्प देऊन स्वागत केले. या वेळी आमदार सावरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांनी घाई करण्याची गरज नव्हती. ट्रायल म्हणून रुग्णालय सुरू करणे ठीक आहे. पण जिल्हाधिकारी यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता. ज्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या खासदार संजय धोत्रे यांना माहिती न देता ओपीडी सुरू केली आहे. असे आमदार सावरकर या वेळी म्हणाले. रुग्णालयाच्या भरती प्रक्रियेकडे पाठपुरावा करू सुमारे महिनाभरात राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाच्या उपस्थितीत रुग्णालयाचे रितसर उद्घाटन करू असेही त्यांनी सांगितले.

सकाळी चार तास सेवा ओपीडी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी १३ रुग्णांची येथे तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.जिल्हाधिकाऱ्यांची धावती भेट सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी यांचे वाहन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मुख्य प्रवेशद्वारासमोर येऊन थांबले. वाहनातून खाली न उतरता जिल्हाधिकारी तत्काळ निघून गेल्या अशी चर्चा येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये होती.

रुग्णालयात चार विभागात आठ डॉक्टर कार्यरत
रुग्णालयात हृदयरोगशास्त्र विभाग, मेंदू विकार (न्युरो) सर्जरी विभाग, बर्न व प्लास्टिक सर्जरी विभाग व किडनीरोग विभाग या चार विभागांची ओपीडी कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात दोन डॉक्टर रुजू झाले आहेत. त्यामुळे येथे ओपीडी सुरु झाली तरी सर्वोपचार रुग्णालयाच्या मनुष्यबळावर ताण वाढणार आहे.

अशी झाली रुग्ण तपासणी
हृदयरोगशास्त्र विभाग : ०९
मेंदू विकार सर्जरी विभाग : ०१
किडनीरोग विभाग : ०३
बर्न व प्लास्टिक सर्जरी
विभाग : ००

बांधून सज्ज असलेले रुग्णालय कधी उघडेल, या प्रतिक्षेत कुलूपालाही गंज चढला आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील एका प्रवेशद्वारासमोर अशी घाण साचलेली आढळून आली.

बातम्या आणखी आहेत...