आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोट्यवधी रुपये खर्चून उभ्या झालेल्या बहुप्रतीक्षित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला अखेर मुहूर्त सापडला. १ ऑगस्टला हे रुग्णालय सुरू होणार आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ अद्याप प्राप्त नसल्याने येथे केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू होणार आहे. तेही ८ स्पेशालिस्ट डॉक्टरांवर रुग्णालयाचा भार असणार आहे. त्यामुळे आधीच अपुऱ्या मनुष्यबळाला तोंड देणाऱ्या सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढणार आहे.
सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण कक्षातून संदर्भित केलेल्या रुग्णांवर सुपर स्पेशालिटीत उपचार होतील. उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्री यांचा विचार करता व भविष्यात टप्प्याटप्प्याने मनुष्यबळ प्राप्त होईपर्यंत सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मर्यादित सुविधा देण्यास सुरुवात करावी यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. जीएमसीमध्ये गुरुवार, २८ तारखेला सकाळी बैठक झाली. त्यानंतर सुपरस्पेशालिटी रुग्णालय कार्यान्वित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जीएमसी प्रशासनास लेखी निर्देश दिलेत. त्यामध्ये म्हटले, की ७ जुलैला जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी बैठक घेऊन हे रुग्णालय सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
सुपर स्पेशालिटी रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळासाठी निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. परवानगीच्या अधीन राहून ५० टक्के मनुष्यबळ नियुक्ती पूर्ण करावी. १ ऑगस्टपासून रुग्णालयाचा बाह्यरुग्ण कक्ष संदर्भित रुग्णांसाठी कार्यान्वित करावा. नंतर मनुष्यबळ उपलब्धता जसजशी होईल तसेच रुग्णालय कार्यान्वयन करताना संभावित अडचणी दूर होत जातील, तशा सुविधा वाढवण्यात येतील, याप्रमाणे नियोजन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी निर्देशात स्पष्ट केले आहे.
चार विभाग कार्यान्वित : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील उपचार सुविधेत १ ऑगस्टपासून हृदयरोगशास्त्र विभाग, मेंदू विकार (न्युरो) सर्जरी विभाग, बर्न व प्लास्टिक सर्जरी विभाग व किडनीरोग विभाग हे चार विभाग कार्यान्वित होणार आहेत. प्रत्येक विभागासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टर रुजू झाले आहेत. ते ओपीडी सांभाळणार आहेत.
मनुष्यबळाचा अभाव : २०० खाटांच्या या रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे प्राप्त झालेले असले तरी अद्याप तज्ज्ञ मनुष्यबळ परिचारिका, तंत्रज्ञ मिळालेले नाहीत. त्यामुळे येथे सद्यस्थिती रुग्णांना दाखल करता येणार नाही. मंजूर पदांपैकी ५० नर्सेस, ४६ वाॅर्डबॉय, ४० सफाई कर्मचाऱ्यांचे टेंडर पूर्ण झाले आहेत. सुमारे दोन आठवड्यात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून मनुष्यबळ मिळेल, असे जीएमसी सूत्रांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येईल
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पहिल्या टप्प्यात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. जसजसे मनुष्यबळ मिळेल तशा इतर सुविधा कार्यान्वित करण्यात येतील. सद्यःस्थितीत सर्वोपचार रुग्णालयातून संदर्भित रुग्णांची येथील ओपीडीमध्ये विशेष तज्ज्ञांकडून तपासणी होणार आहे. त्यांच्या सूचनांप्रमाणे संबंधित रुग्णांना गरजेनुसार सर्वोपचारमध्ये दाखल करून उपचार केले जातील. - डॉ. मीनाक्षी जगभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.