आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशय वाटला:घातपाताच्या प्रयत्नाचा संशय वाटला; गनिमी काव्याने सुटका करुन घेतली

अकोला2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आडून भाजपने षडयंत्र रचले असून, सरकार अस्थिर करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदारनितीन देशमुख यांनी बुधवारी २२ जूनला रात्री पत्रकार परिषदेत केला. दरम्यान त्याठिकाणी घातपाताच्या प्रयत्नाचा संशय वाटल्याने आपण गनिमी काव्याने तेथून सुटका करुन घेतल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

अंमलबजावणी संचालनालया सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा धाक मंत्री, आमदारांना दाखवण्यात येत आहे. भाजपने सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षानिवडणुकांना सामोरे जावे; आम्ही त्यांना शिवसेनेची शक्ती दाखवून देऊ, असे आव्हान आमदार देशमुख यांनी दिले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत येथे गेलेले आमदार देशमुख गुवाहाटीमार्गे दुपारी नागपुरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी अकोल्यात येत पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई, सुरत, गुवाहाटी व नागपूरपर्यंतच्या प्रवासात घडलेला घटनाक्रम आमदारनितीन देशमुख यांनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधतांना सांगितला. मुंबईवरून राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शभुराज देसाई देखील होते. सुरत येण्यापूर्वीच उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार पाटील हे गाडीतून पळून गेले. रात्री आम्ही सुरतला पोहोचलो. नंतर बुधवारी मी गुवाहाटीमार्गे मी नागपूर येथे आलो, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषेदला सहायक संपर्क प्रमुख सेवकाराम ताथोड, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, ‘पश्चिम’चे प्रमुख राजेश मिश्रा, उपशहर प्रमुख योगेश अग्रवाल, युवा सेनेचे नेते राहुल कराळे आदी उपस्थित होते.

आज मुंबईत ः आमदार देशमुख गुरुवारी मुंबईत पोहोणार आहेत. सुरत येथे त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी व पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीसह संपूर्ण घटनाक्रम पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व अन्य नेत्यांना मी सांगणार आहे. त्यानंतरच मी पोलिसात तक्रार देण्याचानिर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत ः आमदार देशमुख शहरात दाखल झाल्यानंतर अकोट फैलमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेसाठी ते आले असता येथेही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती गराडा घालत स्वागत केले. तसेच घोषणाही दिल्या.

ती स्वाक्षरी माझी नव्हेच : कागदावर आमदार देशमुख यांच्यासह अन्य आमदार स्वाक्षरी करताना किंवा लिहिताना दिसून येत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. आमदारांच्या स्वाक्षरीच्या यादीत आमदार देशमुख यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावरच आहे. याबाबत प्रश्न विचारला असता, ती स्वाक्षरी मी केली नसल्याचा दावा आमदार देशमुख यांनी केला आहे. मी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतो. यादीमध्ये माझ्या नावापुढे मराठीत स्वाक्षरी करण्यात आली असल्याने ती माझी नव्हेच, अशी भूमिका त्यांनी घेतली. बँक व्यवहार व अन्य ठिकाणच्या माझ्या स्वाक्षरी पाहून घ्याव्यात, असेही ते म्हणाले.

पोलिस, भाजप कार्यकर्त्यांशी झटापट सुरत येथे पोलिस, काही स्थानिक कार्यकत्यांशी माझी झटापट झाली. आपला घातपात करण्याचा प्रयत्न होता, असा संशय वाटला हे कार्यकर्ते भाजपचे असावेत. हॉटेलमध्ये भाजप आमदार संजय कुटे, मुंबईचे मोहित कंबोजही होते. त्यामुळे या प्रकारावरुन बंडामागे एकनाथ शिंदे दिसत असले तरी हे कटकारस्थान भाजपचे असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला.

आमदारांना केले आवाहन राज्यमंत्री बच्चू कडूंसह सर्व आमदारांनी परत यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ना. कडू यांच्याशीही चर्चा झाली. हा प्रकार याेग्य नसल्याचे त्यांचेही मत आहे. हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसैनिकांचे परिश्रम व मतदारांमुळे शिवसेना आमदार निवडून येतो. त्यामुळे राजकीय भवितव्याचा विचार करून सर्वांनी परत यावे, असे ते म्हणाले.

गनिमी कावा अन् सुटका सुरत येथील रुग्णालयात मी उपचाराचाला विरोध केला. त्यानंतर मला पुन्हा हॉटेलला नेले. मात्र सुटण्यासाठी दुसरा मार्गच नसल्याने शक्तिपेक्षा युक्ति श्रेष्ठ यानुसार मी विचार करुन, मवाळ होऊन ना. शिंदेंसोबतच थांबलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचे मी स्मरण केले. गुवाहाटीला जाताच गनिमी काव्याने मी सुटका करून घेतली. चार्टर प्लेनने मला नागपूरला सोडले. मात्र मला मदत करणाऱ्यांची नावे मी घेवू शकत नाही, असेही ते म्हणाले. त्यांनी काही प्रश्नांची थेट उत्तरे देण्याचेही टाळले.

बातम्या आणखी आहेत...