आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँकेचे अधिकारी असल्याचे भासवून तिघांनी अकोल्यातील शासकीय कंत्राटदारांची १६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिल्ली व मुंबईच्या तिघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार शासकीय कंत्राटदार दीपक वसंतराव डिगोळे यांच्या तक्रारीवरून संदीप जैन रा. काश्मिरी गेट दिल्ली, विनय अग्रवाल उर्फ हर्ष तिवारी, मालाड मुंबई व अमित भंसाली रा. मुंबई यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. २७ जुलै २०२१ रोजी दीपक डिगोळे यांना मध्यप्रदेशातील देवास येथील पाटबंधारे विभागाचे १०० कोटीचे सबकंत्राट के.सी. इन्फाब्लुड या कंपनीकडून मिळाले होते. या कामासाठी दीपक डिडोळे यांना बँक गॅरंटी म्हणून १२ कोटी व बँक कर्ज म्हणून १० कोटींची आवश्यकता होती. याबाबत त्यांच्या एका मित्राने संदीप जैन हा बँकींग व्यवसाय व विनय अग्रवाल हे मुंबई येथील बँकेचे विभागीय व्यवस्थापक आहेत. ते कर्जाची व्यवस्था करून देतील, असे सांगितले. त्यानुसार मुंबई येथे त्यांच्यात एका हॉटेलमध्ये चर्चा झाली. दरम्यान या बैठकीत आरोपींनी बँक गॅरंटी म्हणून १२ कोटी व त्यावर बँक कर्ज म्हणून १० कोटी देण्याचे ठरले व त्यापोटी ८ टक्के कमिशनची मागणी केली. ठरल्याप्रमाणे त्यांनी सुरूवातीला १७ लाख व पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर उर्वरित कमिशन द्यावे लागेल, असे ठरले होते. त्यानंतर डिडोळे यांना एका राष्ट्रीयकृत बँकेचा इमेल आला आणि १२ कोटी रुपयांची बँक गॅरंटी एक वर्ष एक दिवसासाठी कायम करत असल्याचे त्यात नमूद होते. त्यानंतर लगेच संदीप जैन याने डिडोळे यांना फोन करून १२ लाख रुपये तत्काळ पाठवण्याचे सांगितले. त्यानुसार डिडोळे यांनी १० लाख पाठवले मात्र पुन्हा दोन लाख रूपये त्यांनी मागितले. त्यानंतर संदीप जैनने फोनवरून सांगितले की तो आणि बँक गँरटी देणारा असे दोघे जण अकोला येथे त्यांचे घर आणि कार्यालय पाहण्यासाठी येत आहेत. त्यानुसार ते दोघे अकोल्यात आले आणि करारनामा करून निघून गेले. विशेष म्हणजे या दोघांच्या हवाई तिकिटपासून व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतरही संदीप जैन याने वारंवार पैसे मागितले. असे एकंदरीत १६ लाख ३० हजार रुपये दीपक डिडोळे यांच्याकडून घेतले. गैरअर्जदारांनी फोन उचलणे बंद केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दिली व पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४०६,४२०,४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.