आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या पिढीला वाम मार्गापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. याच उद्देशातून रस्त्यावर, बसस्थानक व रेल्वेस्थानक आवरात, नेहरू पार्कमध्ये राहणाऱ्या व शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या समाजातील वंचित मुलांना शिकवण्यासाठी स्थानिक कल्पतरू न. पा. विद्यामंदिरांच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. वंचित मुलांसाठी उन्हाळी विशेष वर्ग सुरू करून या शिक्षकांनी शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांच्या घरापर्यंत पोहचवली आहे.
न. पा. ची असणारी कल्पतरू विद्यामंदिर ही शाळा बस स्थानक परिसरात आहे. या शाळेत बहुतांश गरीब घरातील विद्यार्थी शिकतात. पण शाळेच्या जवळच राहणारी काही मुले शाळेत दाखलच नाहीत. मुख्याध्यापक सुधाकर पिंजरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकारी मित्रांच्या साहाय्याने या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिलेत. अनेकांचे जवळ जन्म दाखले नव्हते. त्याच्या शरीरयष्टीवरून वय ठरवून प्रवेश देण्यात आले.
नियमित वर्गामध्ये वंचित मुलांकडे विशेष लक्ष देता येत नाही कारण इतर मुले पूर्वीपासूनच शाळेत येतात. त्यामुळे परीक्षा झाल्यावर या मुलांसाठी विशेष वर्ग घेण्यात येत आहेत. या वर्गात निरक्षर मुलांना अक्षर ओळख, अंक ओळख शिकविण्यात येत आहेत तर ज्यांना थोडेफार येते त्यांना सोपे अक्षरे, जोडाक्षरे, अंक गणित शिकविण्यात येत आहे. त्यासाठी मुख्याध्यापक सुधाकर पिंजरकर यांच्यासह राजेश हंबर्डे, नंदकिशोर नांदूरकर, कृष्णा तिवारी, नरेंद्र तिवारी, मंगला वाघमारे आदी शिक्षक सहकारी मदत करीत आहेत.
पोषण आहाराचे वाटप : दररोज सकाळी ७.३० ते १० पर्यंत चालणाऱ्या या वर्गातील विद्यार्थी वर्गासाठी पिंजरकर यांनी पोषण आहार ठेवला. पोषण आहार, शैक्षणिक साहित्य यासाठी पिंजरकर, त्यांचे सहकारी शिक्षक व क्रिकेट क्लबचे सदस्यांनी वर्गणी केली. निरक्षर राहून वाममार्गाला लागणाऱ्या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भवितव्य घडविण्याच्या या तळमळीचे गट शिक्षणाधिकारी संदीप मालवे, न. प शिक्षण प्रशासन अधिकारी सुनील तरोळेंनी भेटी देऊन कौतुक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.