आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:कोविड घटला, मास्क हटला; नागरिकांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाची तिसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर जिल्ह्यात मास्कचा वापर घटल्याचे दिसत आहे. शहरातील शासकीय खासगी रुग्णालयातील डॉक्टर कर्मचारी आणि सुमारे एक ते दोन टक्के नागरिक सोडले तर मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकलवरील मास्क विक्रीही पूर्णपणे थांबल्याचे विक्रेते सांगतात.

जिल्ह्यात ३ जानेवारीपासून कोरोनाची तिसरी लाट सक्रिय झाली होती. त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला होता. मार्च महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट नियंत्रणात आल्याने अनेक निर्बंध हटवण्यात आले. त्यानंतर एप्रिलपासून मास्कचा वापरही मोठ्या प्रमाणावर घटला. मात्र आता देश आणि राज्याच्या विविध भागांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौथी लाट येऊ नये यासाठी आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणा तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला कोविडला रोखण्यासाठी आवश्यक तयारी करून ठेवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. अशातच आता राज्य शासनाने पुन्हा मास्कचा वापर करण्याबाबत आवाहन केले आहे. सद्यःस्थितीत कोविड संसर्ग नियंत्रणात असला तरी रुग्णांची संख्या वाढल्यास मास्कच्या वापराबाबत सक्ती केली जाऊ शकते.

सॅनिटायझर विक्री थांबली : कोविड संकटकाळात निर्जंतुकीकरणाचे रसायने आणि सॅनिटायझरचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सॅनिटायझरचा विक्रीही थांबल्याचे विक्रेते सांगतात.

चुकीचा वापरही धोक्याचा : वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार मास्क वापरणाऱ्या लोकांमध्ये अनेक लोक अजूनही चुकीच्या पध्दतीने मास्कचा वापर करतात. अनेकांचे मास्क नाक आणि तोंडावरून काढून हनुवटीवर असतात. काहींचे मास्क ढिले असतात. एकच मास्क वारंवार वापरला जातो, असा वापर चुकीचा आहे.

घाबरू नका, खबरदारी घ्या : राज्याच्या विविध भागांत कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी जिल्ह्यात सद्यस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र रुग्ण वाढीचा संभाव्य धोका लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी वावरताना सुरक्षात्मक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

प्रमुख मास्क आणि संरक्षण टक्केवारी
सर्जिकल आणि एन ९५ या मास्कची संरक्षण टक्केवारी वेगवेगळी असली तरी ती ८० टक्क्यांच्या वर आहे. या दोन्ही प्रकारातील मास्क विषाणू, धूळ, जिवाणू आणि परागकणांपासून संरक्षण पुरवतात त्यामुळे मास्कचा वापर आवश्यक आहे. असे जीएमसीतील तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

महिनाभरात एकही मास्क विकला नाही
कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यानंतर मास्कची विक्री पूर्णपणे थांबली आहे. गेल्या महिनाभरात एकही मास्क विकल्या गेला नाही. यावरून मास्कच्या वापराबाबतची कल्पना करता येते.
- अंजुल जैन, सचिव, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन

बातम्या आणखी आहेत...