आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबई स्थित सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ल्याचा अकोट शहर राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचारी व अन्य काही असामाजिक तत्त्वांनी हल्ला केला. बंगल्याचे प्रवेशद्वार तोडून हे आंदोलक आत घुसले. या आंदोलनकर्त्यांनी निवासस्थानावर चपला व दगड भिरकावले. त्या घटनेचा अकोट शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या हल्ल्याचे मास्टरमाइंड शोधून संबंधितांना कठोर शासन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार नीलेश मडके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून विलिनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. मुंबईच्या आझाद मैदानात हे आंदोलक आंदोलन करत होते. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी स्वत: शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. तसेच हे प्रकरण न्याय प्रविष्ट झाले होते. न्यायालय काय निकाल येईल तो कर्मचारी आणि राज्य शासनाला मान्य असेल अशी भूमिका होती.
त्यानुसार न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कर्मचाऱ्यांनीही आनंदाने हा निकाल स्वीकारला होता. मात्र, अचानकपणे ८ एप्रिल रोजी त्यातील काही कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर जाऊन घोषणाबाजी करत त्यांच्या घरावर दगड व चपला भिरकावल्या. हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. एखाद्या नेत्याच्या घरावर आंदोलन होणे ही पहिलीच वेळ असावी. शरद पवार यांच्या घरावर झालेला हा भ्याड हल्ला निषेधार्ह आहे.
न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हे आंदोलन आपल्या हातून निघून जाईल या भीतीपोटी काहींनी चिथावणी देत कर्मचाऱ्यांना भडकवून देत हा निंदनीय प्रकार घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, या हल्ल्याचा मास्टरमाइंड जो कुणी असेल त्याला शोधून तत्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. निवेदनावर नानासाहेब हिंगणकर, कैलास गोंडचर, नवनाथ लखोटिया, राम म्हैसने, विपुल ठाकरे, प्रमोद लहाने, बाळासाहेब फोकमारे, शंकरराव चौधरी, पुरुषोत्तम जायले, विवेक बोचे, कैलास थोटे, रियाकत अली देशमुख, सै. तनवीर सै. बशीर, अश्फाक खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.