आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य शासनाच्या अर्थ संकल्पात जिल्ह्याच्या पदरात फारसे काही पडले नाही. मात्र वैनंगगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याने जिल्ह्याला २८२.३४ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होणार असून, ८४ हजार ६२५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे एकीकडे पिण्याचे पाणी तर दुसरीकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून, खारपाणपट्ट्यातील पाणी समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास येण्यास अनेक वर्ष लागणार असले तरी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्व विदर्भात असलेल्या वैनगंगेच्या खोऱ्यात ११७ अब्ज फूट (टीएमसी) पाणी आहे. वैनगंगा प्रकल्पामुळे ५७ टीएमसी (२८.३२ दशलक्ष घनमीटर म्हणजे एक टीएमसी) पाणी अडवले गेले आहे. उर्वरित ६० टीएमसी पाणी वाहून जाते. हे सर्व लक्षात घेऊनच राष्ट्रीय जलविज्ञान प्राधिकरण (हैदराबाद) यांनी २००९ ला सर्वेक्षण केले होते. त्यावेळी या नदीजोड प्रकल्पासाठी ८ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र त्यावेळी सर्वेक्षणाच्या पलीकडे या प्रकल्पाचे काम गेले नाही.
मात्र नागपूर जलविकास प्राधिकरणाने नव्याने सर्वेक्षण करुन प्रकल्प अहवाल सादर केला. वैनगंगा प्रकल्पातून सोडलेले पाणी पारंपारिक कालव्या ऐवजी बंद पाइपमधून ४२६ किलोमीटरचा प्रवास करुन बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीत आणले जाणार आहे. नागपूर,वर्धा,अमरावती , अकोला या चार जिल्ह्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. तर सर्वाधिक कमी पाणी यवतमाळ जिल्ह्याला मिळणार आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यासाठी नदी जोड प्रकल्प उपयुक्त ठरणार असला तरी अकोला जिल्ह्यासाठी मात्र हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.
या प्रकल्पासाठी ७२ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच ७५० मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीही केली जाणार आहे. जिल्ह्यात निम्न काटेपूर्णा, येळवण, सीसा उदेगाव, चिखलगाव या ठिकाणी जल प्रकल्प बांधण्यात येणार असून, काटेपूर्णा प्रकल्पात पूनर्भरण केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात २८२.३४ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त जलसाठा उपलब्ध होणार असून, ८४ हजार ६२५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
खारपाणपट्ट्याला होईल फायदा
अकोला-अमरावती-बुलडाण्यात पूर्व-पश्चिम १०० ते १५० कि.मी. उत्तर ते दक्षिण १० ते ६० कि..मी. खारपाणपट्टा आहे. जिल्ह्यातील ७७५ गावे त्यात आहेत. १ लाख ९४ हजार हेक्टर जमीन त्यात येते. येथील पाणी पिण्यास वापरता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त जलसाठा उपलब्ध झाल्यानंतर येथील सर्व गावांत पाणी पुरवठा योजना पोहाेचतील. त्यामुळे नदीजोड प्रकल्प खारपाणपट्ट्यात फायदेशीर ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.