आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पाची साठवण:पाटबंधारे विभागानेच सिद्ध केली दगड पारवाची मूळ साठवण क्षमता

श्रीकांत जोगळेकर । अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा पुरापासून बचाव करण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगड पारवा प्रकल्पाची साठवण क्षमता १०.१९ दलघमीपेक्षा अधिक असल्याचे पाटबंधारे विभागानेच एका अर्थी मान्य केले आहे. प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडल्या- नंतर प्रकल्पात १०.८१ दलघमी (१०६.०८ टक्के) साठा असल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाची मूळ साठवण क्षमता २१.१९ दलघमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ‘दिव्य मराठी’ने दगड पारवा प्रकल्पाच्या साठवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

बार्शीटाकळी शहरातून वाहणारी विद्रुपा नदी अकोला शहराजवळ मोर्णा नदीला येवून मिळते. त्यामुळे मोर्णा नदीला येणाऱ्या पुरापासून संरक्षण करण्यासाठी विद्रुपा नदीवर दगड पारवा येथे प्रकल्प बांधण्यात आला. हा प्रकल्प बांधण्यामागे शहराचे पुरापासून संरक्षण करणे हाच केवळ उद्देश होता. या प्रकल्पाची मूळ साठवण क्षमता २१.१९ दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी १० दलघमी पाणी महापालिकेसाठी आरक्षित करण्यात आले, तर १० दलघमी पाणी पुराचे पाणी म्हणून टप्प्या-टप्प्याने सोडण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. महापालिकेने आरक्षित पाण्याचे पैसे न भरल्याने या १० दलघमीतून पाटबंधारे विभागाने सिंचनासाठी डावा, उजवा कालवा बांधला. मात्र, शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणीच घेतले नाही, ही बाब वेगळी.

२००७ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला, पण प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पात प्रारंभीचे तीन ते चार वर्ष जलसंचय झाला नाही. त्यामुळे पाणी सोडण्याचा प्रश्न उद््भवला नाही. मात्र, मागील तीन वर्षापासून या प्रकल्पात चांगला जलसाठा उपलब्ध होत असल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडले जातात.

दरम्यान, या प्रकल्पाची मूळ साठवण क्षमता २१.१९ दलघमी असताना पाटबंधारे विभागाने प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या यादीत या प्रकल्पाची साठवण क्षमता १०.१९ दलघमी दाखवली. त्यामुळे प्रकल्पात ८ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला की प्रकल्पातून विसर्ग सुरु करण्यात येतो. त्यामुळे हा प्रकल्प शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी की शहरात पूर आणण्यासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

१०६.०८ टक्के जलसाठा कसा?
कोणत्याही प्रकल्पात जुलै, ऑगस्ट महिन्यात किती तारखेपर्यंत आणि किती दलघमी जलसाठा ठेवावा, हे निश्चित केले जाते. त्यानुसार प्रकल्पातून विसर्ग सुरु करण्यात आला. मात्र एखाद्या प्रकल्पातून विसर्ग केल्यानंतर त्या प्रकल्पात १०० टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा राहूच शकत नाही. मग तो दगड पारवा प्रकल्पात कसा राहू शकतो? ही बाब महत्त्वाची आहे. पाटबंधारे विभागाने दगड पारवा प्रकल्पात १०६.०८ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याची नोंद केली आहे. याचाच अर्थ प्रकल्पाची साठवण क्षमता १०.१९ दलघमी पेक्षा अधिक आहे, ही बाब पाटबंधारे विभागाने मान्य केली आहे. १०० टक्क्यांपेक्षा अधिक टक्केवारी रिकव्हरी करताना वापरली जाते.
पाणी सोडताना कशी काय? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...