आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:मोकाट जनावरे पकडण्याचे काम महापालिका कंत्राटी पद्धतीने देणार; निविदा प्रक्रिया राबवणार

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचे काम कंत्राटी पद्धतीने केले जाणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, येत्या काही दिवसांत ठेकेदाराकडून हे काम करुन घेतले जाणार आहे. ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी ६ सप्टेंबरला शहरातील मोकाट जनावरांच्या त्रासासंदर्भात वृत्त प्रकाशित करुन या गंभीर विषयाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

शहरात मोकाट श्वानांसोबत जनावरांचीही संख्या वाढली आहे. बकरी, गाय, वासरु, गोऱ्हे तसेच वळू यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे बकरी, गाय, वासरु, गोऱ्हे पकडून कोंडवाड्यात टाकल्यानंतर या जनावरांचे मालक दंडाची रक्कम भरुन आपापली जनावरे घेवून जातात. मात्र एकतर कोंडवाडा विभागाकडून वळूला पकडून कोंडवाड्यात टाकले जात नाही. तसेच एखादवेळी वळूला कोंडवाड्यात टाकले तर त्याला सोडवण्यासाठी कुणी येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनासाठी वळू डोकेदुखी ठरला आहे. अनेक भागात या वळुंमुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यानंतर कोंडवाडा विभागाचे कर्मचारी वळूला पकडण्यासाठी येतात.

गाढवांचाही अडथळा
वळूंमुळे नागरिक जखमी होत आहेत. याच बरोबर गाढवांमुळे रहदारीत अडथळा होतो. अनेकदा गाढवांना कोंडवाड्यात बंद केल्यानंतर गाढवाचे मालक त्यांना सोडवण्यासाठी येत नव्हते. तसेच हर्रासीच्या वेळी केवळ गाढवाचे मालकच उपस्थित राहायचे. त्यामुळे गाढवांना पकडून त्यांना केवळ चारा देण्याचे काम महापालिकेला करावे लागल्याने महापालिकेने गाढवांना कोंडवाड्यात टाकणे बंद केले आहे. त्यामुळे गाढवांचा रहदारीतील अडथळा मात्र कायम आहे.

वळूंना कोणी घेत नाही
मोकाट वळूंना कोंडवाड्यात बंद केले तर सात दिवसानंतर हर्रासीत कोणी येत नाही. हर्रासीला कोणी आले नाही तर गाय, वासरु गोरक्षणला दिले जातात. मात्र वळूंना कोणी घेत नाही. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वळूंना पकडण्यात अडचणी येतात. त्यामुळे मोकाट जनावरे पकडण्याचे कंत्राट देणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाईल. ती पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराला मोकाट जनावरे पकडण्याचे काम देण्यात येईल.
अनिल बिडवे, प्रभारी कोंडवाडा विभाग प्रमुख, मनपा.

बातम्या आणखी आहेत...