आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचा खरा मालक हा नागरिक आहे. निवडून गेलेला प्रतिनिधी आणि मतदार यांचे नाते मालक आणि कामगार आहे. पण देशाचा मी मालक ही संकल्पना रुजली नाही. तर गुलामगिरीच्या स्वभावातून आपल्याकडे हुजरेगिरीची मानसिकता आली आहे. ही मानसिकता आता आपण स्वतंत्र झालो हे मान्य करायला तयार नाही. त्यामुळे हुजरेगिरीची संकल्पना समाज व्यवस्थेतून बाहेर काढावी लागणार आहे. त्यासाठी शेवटच्या घटकाला निर्णय घेण्याचा अधिकार द्या. तेव्हा तो भूमिका घ्यायला तयार होतो, असे मत ज्येष्ठ विचारवंत तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी अकोल्यात मांडले.
दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला व सामर्थ्य फाउंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आरएलटी महाविद्यालयात ११ नोव्हेंबरपासून तीन दिवसीय सामर्थ्य व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सायंकाळी सातनंतर सुरू झालेल्या व्याख्यानात परिस्थिती आज आणि उद्या या विषयावर अॅड. आंबेडकर यांनी मत मांडले. अर्थशास्त्रीय आणि गैरअर्थशास्त्रीय गुलामगिरीतून आलेला हुजरेगिरीचा स्वभाव व्यवस्थेतून काढावा लागेल ................... दृष्टिकोनातून त्यांनी विषयाची सविस्तर मांडणी केली. ते म्हणाले. देशाचा मालक नागरिक, मतदार हा खरा मालक आहे. पण ही संकल्पना रुजली नाही. इंग्रजी चित्रपटांमध्ये तेथे निवडून गेलेल्या प्रतिनिधीला पोलिसांकडून शिक्षा मिळते असे दृष्य दिसते. अर्थात तो त्यांच्या समाजव्यवस्थेचा भाग आहे. पण आपल्या येथे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी दिलेला पोलिस आमदार आणि खासदार आला की त्यांची हुजरेगिरी करतो.
ही मानसिकता गुलामगिरीतून आली आहे. कुणी जेव्हा सरकारला ‘मायबाप सरकार’ संबोधित असेल तर मला तेव्हाही त्याच्या गुलामगिरीची जाणीव होते. आपण आता स्वतंत्र झालो हे मान्य करायलाच तो तयार नाही. त्यामुळे हुजरेगिरीची संकल्पना समाज व्यवस्थेतून बाहेर काढावी लागेल, असे ते म्हणाले. अध्यक्षीय पद्धत आणि पार्लमेंटरी पद्धतीची अॅड. आंबेडकर यांनी विस्तृत मांडणी केली. पार्लमेंटरी पद्धतीत समाजव्यवस्था स्थिर राहण्याची हमी आहे. त्यामुळे शांतता प्रस्थापित राहते. अध्यक्षीय पद्धत ही हुजरेगिरीच्या मानसिकतेला खतपाणी घालते. समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेत शांतता येत नाही, असे ते म्हणाले. यावेळी दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोलाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता अध्यक्षस्थानी होते. सामर्थ्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे व्यासपीठावर होते. त्यांनी प्रास्ताविक केले.
.....................
नवी आणि जुनी मूल्ये
ज्या कुटुंबात युवा पिढीसोबत संवाद आहे. जेथे युवकांना प्रयोग करण्याची संधी आहे. तेथे युवकांमध्ये व्यसनाधीन होण्याचे प्रमाण कमी आहे. जेथे वाव नाही तेथे व्यवसाधीनता वाढताना दिसते. त्यामुळे युवा पिढीच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. वीस वर्षापूर्वीची नि आताची युवा पिढी फार बदलली आहे. पूर्वी आई-वडिलांचे मत घेऊन ते मान्य करावे लागे. आजच्या पिढीवर एखादी बाब लादण्याचा प्रयत्न केला तर ही पिढी कारण मागते. यातून समोर येणाऱ्या जुन्या आणि नव्या मूल्यांची अॅड. आंबेडकर यांनी मांडणी केली.
...तर व्यवस्था कोलमडते
व्यवस्थेबाबत अॅड. आंबेडकर यांनी बँक आणि शेअर बाजाराचे उदाहरण दिले. बँक आपल्याला पैशांच्या बाबतीत सुरक्षित ठेवते. पण शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला स्वत:लाच सुरक्षित करावे लागते. आजची समाजव्यवस्थाही अशीच आहे. येथे मला स्वत:ला सुरक्षित करावे लागेल. त्यासाठी व्यवस्थेचे ज्ञान घेऊन येथे मत मांडणं मी शिकले पाहिजे. हे मत मांडले नाही तर व्यवस्था कोलमडायला सुरुवात होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.