आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:महापालिकेच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचनाही स्थगित करण्याचे निर्देश

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारने महापालिका प्रभाग रचना आणि सदस्य संख्येबाबत घेतलेला निर्णय बुधवारी एकनाथ शिंदे सरकारने बदलवला. मात्र गुरुवारी दिवसभरात याबाबतचे स्पष्ट निर्देश न आल्याने आधीच्याच प्रभाग रचनेनुसार इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठीच्या सोडतीवर हरकती व सूचना दाखल झाल्यानंतर ५ ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात येणार हे निश्चित होते. केलेली मेहनत वाया जाईल असे जरी प्रशासनाला वाटत असले तरी नियमानुसार मात्र त्याबाबतचे सोपस्कार पार पाडण्याच्या तयारीत प्रशासन होते. मात्र शुक्रवारी होऊ घातलेल्या महापालिकेच्या अंतिम आरक्षणाची अधिसूचना देखील स्थगित करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्याने यावर आता पडदा पडला आहे.

चार सदस्य प्रभाग रचनेचा फायदा आजपर्यंत भाजपला होत आला आहे. २०१७ च्या निवडणुकीमध्ये ८० पैकी ४८ सदस्य भाजपचे निवडून आले होते. एकगठ्ठा मतदान भाजपच्या पारड्यात या पद्धतीने पडत असल्याने महानगरातील इच्छुक भाजप उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वेळी सुद्धा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली होती; मात्र पुन्हा बदललेल्या प्रभाग रचनेचे बोनसही आता भाजपला मिळणार असल्याचे चर्चा आहे. आता पुन्हा नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेचा फायदा भाजप नंतर काँग्रेसला झाला होता. गत वेळी काँग्रेस दोन नंबरचा पक्ष म्हणून महापालिकेत होता. मुस्लिमबहुल प्रभागात गठ्ठा मतदान हे काँग्रेसच्या झोळीत पडले. गेल्यावेळी काँग्रेसचे १३ नगरसेवक निवडून आले होते.

विविध पक्षात बंडखोरीचीही शक्यता
मनपाच्या जागांमध्ये ११ ने वाढ झाली होती. त्यामुळे प्रत्येक पक्ष मागील निवडणुकीच्या तुलनेने ११ इच्छुकांना संधी देऊ शकणार होता. मात्र आता जागा ९१ पेक्षा कमी असणार आहेत. त्या ८१ ते ८५ होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

जुनीच पद्धत कायम राहणार असल्याने अनेक इच्छुकांचे चेहरे खुलले
ओबीसी आरक्षणा नंतर अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले होते. तर काहींना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग होणार आहे. त्यामुळे प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, मतदार याद्या आदी सर्वच बाबी प्रशासनाला नव्याने कराव्या लागणार आहेत. त्यामुळेच तीन सदस्य प्रभागात ज्यांचे पत्ते कट झाले होते अशांना मात्र सुरक्षित वाटत आहे. आता पुढच्या रचनेत आपली जागा निश्चित पक्की होईल, अशी आशा दिग्गजांसह इच्छुकांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...