आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची वाजत-गाजत मिरवणूक:अधिकारी झालेल्या शेतमजुराच्या मुलीची वाजत-गाजत मिरवणूक; डाबकी गावातील पहिलीच एमई झालेली मुलगी बनली बँकेत अधिकारी

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीने ध्येय निश्चित केल्यास तो परिस्थितीवर मात करु शकतो. आपण उच्च शिक्षित नसलो तरी मुलांना मात्र उच्च शिक्षण द्यायचेच, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डाबकीतील एका शेतमजुराने पाल्यांना उच्च शिक्षण दिले. विशेष म्हणजे कष्टातून मुलीला बीई नव्हे तर एमई केले. मुलीनेही आई-वडीलांचे कष्ट लक्षात घेवून जिद्द, चिकाटीने अभ्यास केला.

डाबकी तील ही सोनल नावाची मुलगी पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी म्हणून नियुक्त झाली. आपल्या गावातील पहिलीच मुलगी अधिकारी झाल्याचा आनंद गावकऱ्यांनी मिठाई वाटून व्यक्त केला नाही तर मुलीची घोड्यावर बसवून ढोल-ताशांच्या निनादात फटक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. गाव परिसरात मुलगी अधिकारी झाल्याचा अशा व्यक्त केलेल्या आनंदाची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

शहराजवळील डाबकी गाव सहा वर्षापूर्वी स्वतंत्र ग्रामपंचायतीचे क्षेत्र होते. आता मनपा हद्दवाढीत येवूनही गावाचा कायापालट मात्र झालेला नाही. गावात जि. प.ची एक शाळा. याच गावात बळीराम मोरे कुटुंबासह राहतात. बळीराम आणि त्यांची पत्नी शोभा यांना दोन मुले, दोन मुली. बळीराम आणि शोभा दोघेही कमी शिक्षित मात्र मुलांना उच्च शिक्षित करायचे, असा ध्यास त्यांनी घेतला. ध्यासच घेतला नाही. तर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक तंगी जावू नये, यासाठी शेतमजुरी सोबत अन्य कामेही सुरू केली. आई-वडीलांचे कष्ट लक्षात घेवून त्यांच्या मुलांनीही अभ्यासक्रम पूर्ण केला.

परिणामी बळीराम आणि शोभा मोरे यांच्या कष्टाचे चीज झाले. सोनलनेही बीई पूर्ण केल्यानंतर एमईला प्रवेश घेतला. एमईचे शिक्षण तर बीई झाल्यानंतर स्पर्धा परिक्षांची तयारी, अशी दुहेरी जबाबदारी सोनले सांभाळली. तिच्या मेहनतीला फळ मिळाले. दिलेल्या स्पर्धा परिक्षेत ती उत्तीर्ण झाली आणि पंजाब नॅशनल बँकेत ती स्पेशल अधिकारी म्हणून तिला नोकरी मिळाली.

आपल्या गावातील पहिली अभियंता मुलगी आणि बँकेत अधिकारी झाली. याचा आनंद केवळ मोरे कुटुंबीयांनाच झाला नाही तर संपूर्ण गावाला झाला आणि मग सुरू झाली, आनंदोमहोत्सवाची तयारी. फेटा बांधलेल्या सोनलची घोड्यावरुन गावातून मिरवणूक काढली. फटाक्यांची आतषबाजी, मिठाईचे वाटप करुन गावकऱ्यांनी गावातील मुलगी अधिकारी झाल्याचा आनंद व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...