आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत हे एखाद्या वृक्षाप्रमाणे असतात. वृक्ष ज्याप्रमाणे स्वतः झिजून सर्वांना शीतलता व विविध फळे प्रदान करतात. शीतलता व फळ हा वृक्षांचा स्थायी गुण आहे. बऱ्यावाईट बाबी, संग-असंग, कडू, गोड याचा कोणताही विचार व भेदाभेद न करता वृक्ष सर्वांना सदा काहीतरी देण्याचेच कार्य करीत असतात.
तीच कृती सकल संत विश्वाची आहे. संत हे सर्वांना एकसमान भक्तीरुपी विश्वास प्रदान करून भक्तांचे सदा कल्याण करीत असतात. म्हणून अशा परोपकारी व सत्प्रवृत्तीच्या संतांचा संग करून जीवन कृतकृत्य करण्याचा हितोपदेश कळंबा कसुरा येथील हभप प्रल्हाद महाराज ढोले यांनी केला. डाबकी रोड परिसरातील वानखडे नगर येथील श्री कर्ता हनुमान मंदिरात शनिवार १६ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या कीर्तन उत्सवात हभप प्रल्हाद महाराज ढोले यांनी कीर्तनाचे द्वितीय पुष्प अर्पण केले.
ते म्हणाले झाडांचे काही प्रकार असतात. सामान्य झाड, काटेरी झाड, कडू झाड, गोड झाड असे प्रकार असतात. त्याचप्रमाणे माणसाच्या स्वभावाचेही अशाच प्रकारचे गुण आहेत. तथापि, सामान्य झाड, कडू झाड अथवा काटेरी झाड कोणताही भेदभाव न बाळगता जीवसृष्टीवर लाकूड, फळ, पाने, औषध आदी मुळे परोपकार करीत असते. त्याचप्रमाणे सामान्य माणसेही जर झाडरूपी संताच्या सानिध्यात आलीत तर त्यांचेही दुर्गुण नष्ट होऊन त्यांचे समाजात मूल्य वाढते.
आपले मूल्य वाढविण्यासाठी अशा त्यागी, शांत संतांच्या शरण जाऊन लौकिक प्राप्त करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सकाळी व दुपारी मेहकर येथील लोणी गवळीचे रामायणाचार्य हभप विश्वरदास महाराज वैष्णव यांनी भागवाताची महिमा सांगितली.
यावेळी रामजन्म मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. रामाची भूमिका पार्थ वैद्यने साकार केली. उत्सवाचे अन्नदाते दादा वंजारे, गोपाल उजाडे, गजानन धरमकर यांचा सत्कार महाराजाच्या हस्ते करण्यात आला. तर संध्याकाळी हभप गजानन माळी यांचा हरिपाठ झाला. कीर्तनकाराचे पुजन माजी सैनिक शंकरराव देशमुख यांनी केले.
दि १६ एप्रिल रोजी सामूहिक पारायणास बसणाऱ्यांना हस्त लिहीत ज्ञानेश्वरी वितरित करण्यात येणार आहे. संचालन माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका मंगलाताई म्हैसने, माधुरी क्षीरसागर, प्रा. दादा वंजारे, गोपाल उजाडे, गजानन खोटरे, प्रभाकर खोटरे, भागवत गिरी, माजी सैनिक लक्ष्मण मोरे, प्रभाकर म्हैसने आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.