आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर्त दिलासा:दहा मेपर्यंत विवाह बंधनांच्या आड येणार नाही नियमांचे बांध; मंगल कार्यालयांच्या निकषांबाबत हरित लवादातील सुनावणी पुढे

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स आदी ठिकाणी आयोजित विवाह आदी सोहळे १० मे पर्यंत नियमांच्या बंधनाविना पार पडणार आहेत. यासंदर्भात प्राधिकरणासमोर ३० मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने झालेली सुनावणी झाली, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता ही सुनावणी १० मे रोजी होणार आहे. त्यानंतर आधीपासून बुक असलेले सोहळे कुठे करावेत? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने, मंगल कार्यालय संचालकांचे लक्ष लवादाच्या निर्णयाकडे लागले आहे.

शहरातील एका मंगल कार्यालयासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित मंगल कार्यालयाकडे पार्किंग व्यवस्था नसल्याने तसेच समारंभामुळे होणारा त्रास आदींबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने संबंधित व्यक्तीने राष्ट्रीय हरित प्राधिकरण (दिल्ली)कडे तक्रार दाखल केली. यावरुन प्राधिकरणाने पर्यावरणाच्या अनुषंगाने निकषाचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्राधिकरणाच्या या सूचनेवरून महापालिकेने धडक कारवाई सुरू करत शहरातील ५५ मंगल कार्यालये व लॉन्स सील केले होते. परिणामी अनेक विवाह आदी मंगल कार्यक्रमांवर संक्रांत ओढवली होती.

त्यानंतर महापालिकेने संबंधितांकडून हमीपत्र घेऊन सील उघडले होते. या विरोधात तक्रारकर्त्याने हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आतापर्यंत ११ फेब्रुवारी व नंतर ३० मार्च रोजी ऑनलाइन सुनावणी झाली. परंतु ती सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. आता ही सुनावणी १० मे रोजी होत आहे. लवादाने संपूर्ण नियमांचे पालन करण्याचे आदेश मंगल कार्यालये, लॉन आदींना दिल्यास १० मे नंतर आयोजित विवाह सोहळे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘हे’ आहेत निकष... : इमारत बांधकाम परवानगी, इमारत वापर प्रमाणपत्र (भोगवटा प्रमाणपत्र), वाहनतळ सुविधा, अग्निशमन व्यवस्था, घनकचरा व द्रवरूप कचऱ्याची व्यवस्था, सीसीटीव्ही, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग प्लान्ट, व्यवसाय परवाना, मालमत्ता कराचा भरणा, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र, वैध नळजोडणी, स्थानिक पोलिस ठाण्याचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र

बातम्या आणखी आहेत...