आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातो दिवस अजूनही आठवतो. २९ जानेवारी २०२२. प्रथमच अकोला ते पूर्णा सेक्शन दरम्यान सहायक लोको पायलट म्हणून रुजू झाले. इंजिन केबिनमध्ये दाखल झाले. गाडी सुटायची वेळ आली. मनात भीती दाटून आली. भोंगा वाजला. तशी हृदयाची धडधड अधिकच वाढली. नेहमीसाठी हे आपल्याला जमेल का, असं क्षणभर वाटलं. या क्षेत्रात येऊन चूक तर केली नाही? असंख्य प्रश्नांनी डोक्यात गर्दी केली. तेवढ्यात ग्रीन सिग्नल मिळाला. गाडी स्टेशनवरून सुटली. तसे झुळझुळ वाऱ्यांसह मनातील प्रश्न हवेत विरले. मालगाडीच्या गतीसोबत आत्मविश्वासाची गती वाढत गेली... जागतिक महिला दिनाच्या औचित्याने वेगावर स्वार झालेल्या एका जिद्दी महिलेविषयी...
आज रिक्षापासून, जहाज, विमान, रेल्वे गाड्याही महिला मोठ्या कौशल्याने चालवत आहेत. असंख्य अडचणींवर मात करून शारीरिक, मानसिक बळ एकवटून खंबीरतेने पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अशाच एक आव्हानात्मक क्षेत्रात सुकेशनी वसंत घरडे अकोल्यात काम करते. ती रेल्वे दक्षिण मध्य झोनमधील नांदेड विभागात सहायक लोको पायलट पदावर कार्यरत आहे. सुकेशनी मूळ बडनेराची. आठवीत असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. घरचे आर्थिक गणित बिघडले. विज्ञान विषयाची आवड असताना सुकेशनीला कला शाखेत प्रवेश घ्यावा लागला. घरी लहान भाऊ आणि आई. वडिलांच्या निधनानंतर आईची प्रकृती अस्थिर असायची.
त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी स्व:च्या खांद्यावर घेणे क्रमप्राप्त होते. बारावीनंतर डी. एड. केले. मात्र, बाजारीकरणाच्या काळात शिक्षिकेची नोकरी मिळवणे अवघड झाले. त्यामुळे सुकेशनीने आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न तिने बघितले. रात्रंदिवस अभ्यास केला. स्पर्धा परीक्षा दिल्या. तीन वर्षाच्या अथक परिश्रमाला १५ ऑक्टोबर २०१९ ला यश आले. रेल्वेच्या ग्रुप डी विभागाची परीक्षा तिने उत्तीर्ण केली. पहिली नियुक्ती ट्रॅक व्यवस्थापक म्हणून पनवेलला झाली. त्यानंतर २ ऑक्टोबर २०२१ मध्ये सहायक लोको पायलट म्हणून रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात रुजू झाली. सध्या अकोला कार्यालयात सुकेशनी ऑफीस आणि फिल्ड दाेन्ही जबाबदाऱ्या आवश्यकतेनुसार पार पाडते. अकोट-अकोला पॅसेंजर, तिरुपती एक्स्प्रेस, तसेच मालगाडी चालवण्याचा अनुभव तिच्या गाठीशी आहे.
लोकांच्या नजरेतील कुतूहल
गाडी चालवताना चढावानुसार स्पीड नियंत्रण, ब्रेकचे टायमिंग साधने, प्रवाशांनी चेन ओढल्यास शांततेत परिस्थिती हाताळणे, अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ड्रायव्हिंग करताना अचानक एखादी व्यक्ती, प्राणी ट्रेकवर येतो. त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. परंतु एखाद दिवशी ते शक्य होत नाही. तो दिवस आमच्यासाठी तणावाचा ठरतो. सर्व महिला रेल्वे चालक शारीरिक व मानसिक अडचणींना पुढे जाऊन मोठ्या जिद्दीने काम करतात. रेल्वेच्या इंजिन डब्यात महिलेला बघून प्रवाशांच्या डोळ्यात कुतूहल आणि कौतुक एकाच वेळी दाटून येतं. हे समाधान शब्दात वर्णन करता येणार नाही. -सुकेशनी वसंत घरडे, सहायक लोको पायलट, दक्षिण- मध्य झोन, रेल्वे विभाग.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.