आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जलकुंभ:जलकुंभांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल 20 दिवसात सादर हाेणार

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धोकादायक ठरलेल्या तीन जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक स्थैर्य तपासणी) शुक्रवारी २ डिसेंबर रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीच्या पथकाने पूर्ण केली. याबाबतचा अहवाल १५ ते २० दिवसात महापालिकेला सादर केला जाणार आहे. या अहवालानुसार महापालिकेला पुढील कार्यवाही करावी लागेल.

शहरात १९७७ साली नविन बसस्थानका मागील दोन आणि जुने शहरातील शिवनगर भागात जलकुंभ बांधण्यात आले होते. २००६ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजना महापालिकेने स्वत:च्या ताब्यात घेतली. हस्तांतरणाच्या वेळी मजिप्राने हे तीन जलकुंभ क्षतिग्रस्त झाल्याची माहिती दिली होती. मात्र महापालिकेने या जलकुंभाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. दिव्य मराठीने या अनुषंगाने २७ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्या नंतर प्रशासनाने जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांच्याकडून २ डिसेंबर रोजी करुन घेतले.

हे स्ट्रक्चरल ऑडिट शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अप्लाइड मेकॅनिक्स (उपयोजिता यंत्र शास्त्र विभाग) चे असोसिएट प्रोफेसर बी.एस.लांडे, आर.आर.अकर्ते, राहुल डुलगज यांनी केले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे, कनिष्ठ अभियंता शैलेश चोपडे, नरेंद्र बावने, तुषार टिकाईत,रामेश्वर दोड, व्हॉल्वमन सुधीर ढुके, गणेश घोडके, धनराज पातोंडे, नागनाथ मोरे, संतोष पाचपोर, संतोष बडवे, धनराज सदाशिव उपस्थित होते.

जलकुंभावर चढताच आले नाही स्ट्रक्चरल ऑडिट करताना जलकुंभाचे डिझाईन आवश्यक ठरते. मात्र महापालिकेकडे तसेच मजिप्राकडे याबाबत कोणतेच कागदपत्र नाहीत. तसेच जलकुंभाच्या पायऱ्या अत्यंत क्षतिग्रस्त झाल्याने जलकुंभाच्यावर चढता आले नाही. तशी सोयही महापालिकेने केली नाही.

तूर्तास पाणी कमी भरावे लागेल प्राथमिक पाहणीनुसार तीन जलकुंभांना दुरुस्तीची गरज आहे. मात्र पूर्ण अहवाल तयार केल्या नंतरच नेमक्या उपाय योजना सुचवल्या जातील. मात्र जलकुंभाच्या क्षमतेनुसार जलकुंभ न भरता जलकुंभात पाणी कमी भरावे लागेल? एवढी बाब निश्चित आहे. - बी.एस.लांडे, असोसिएट प्रोफेसर

बातम्या आणखी आहेत...