आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवनुक:‘आयबी’कडून आल्याचे सांगत संशयित शिरला माजी आ. बाजोरियांच्या बंगल्यात

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोरव्हिलर घेऊन गुरुवारी सकाळी थेट एक जण आमदार बाजोरिया यांच्या बंगल्यात शिरला. गाडी पार्क करून बंगल्याचे समोरील बाकावर जाऊन बसला. ‘मी आयबीचा माणूस आहे, तुमच्याकडे असलेल्या सर्व वाहनांचे आणि घराचे कागदपत्र दाखवा’, असे म्हणत बाजोरिया यांच्या नातवासोबत त्याने वाद घातला. मात्र तो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला बंगल्याबाहेर काढून खदान पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर यश अश्विनकुमार बाजोरिया यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रतिक संजयकुमार गावंडे (वय ३२ वर्ष, रा. लेडी हार्डिग काँर्टर्स) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया यांचा मूर्तिजापूर रोडवर बंगला आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान प्रतिक संजयकुमार गावंडे याने (एमएच ०४ एफयू ०९१९ क्रमांकाची) कार बंगल्याच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगमध्ये पार्क केली. त्यानंतर तो गोपिकिशन बाजोरिया यांच्या बंगल्यासमोरील बाकावर जाऊन बसला. त्याला पाहून यश अश्विनकुमार बाजोरिया यांना संशय आला.

त्यानंतर यश आणि त्यांचे काका संजय बाजोरिया व सुनिल बाजोरिया त्याचे जवळ गेले. विचारपूस करताच त्याने आपण आयबीचा माणूस असल्याचे सांगून सर्व गाड्यांचे कागदपत्र तसेच चाव्या मागितल्या. दमदाटी करून त्यांने दोन गाडयांची चावी देखील घेतली. त्यानंतर घराचे कागदपत्र मागू लागला. त्यानंतर संशय आल्याने यश आणि त्यांच्या काकांनी त्याला ओळखपत्र मागितले.

परंतु त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. नाव, गाव विचारले असता त्याने प्रतिक संजयकुमार गावंडे असे नाव सांगितले. त्यानंतरही तो घरात शिरण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने जबरदस्ती करत शिविगाळ केली व पाहून घेतो अधी धमकीही त्याने दिली. यश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदविचे कलम ४५२, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला वाहनांवर असलेल्या युनिक नंबरचे फोटो काढण्याचा छंद आहे, त्यामुळे तो वेगवेगळ्या वाहनांचे फोटो काढण्यासाठी बंगल्यात गेला असावा, अशी माहिती समोर आली.

तीन दिवसांपासून मारत होता चकरा : यश बाजोरिया हे मुंबई येथे लॉचे शिक्षण घेत आहेत. ३१ रोजी सकाळी ते मुंबईहून घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या समोर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आरोपी हा तीन दिवसांपासून त्याची कार घेऊन येत होता व चकरा मारत होता. त्याने त्याच्या मोबाइलमध्ये बंगल्याचे फोटो काढले आहेत. बंगल्याच्या आत अनधिकृतरित्या प्रवेश करून तो त्याची कार पार्क करीत होता. त्याच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी असेही एफआयआरमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...