आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातून वीजमीटर खरेदी करू नका:वीजमीटरचा तुटवडा नाही; अफवा चुकीच्या, संभ्रमांवर विश्वास न ठेवण्याचे महावितरणचे आवाहन

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणमध्ये वीजमीटरचा तुटवडा आहे, असा संभ्रम सोशलमाध्यमातून वीजग्राहकांमध्ये निर्माण केला जात आहे. हे अतिशय चुकीचे असून वीजग्राहकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये.नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांकडून मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणचे संबंधित कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याने वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी आहे सध्याची स्थिती

गेल्या एप्रिल अखेर 1 लाख 31 हजार 802 वीजमीटर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होते तर मे महिन्यापासून आतापर्यंत आणखी 2 लाख 50 हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सोबतच कार्यादेश दिलेल्या 75 हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठा देखील सुरु झाला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध आहेत असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

2 लाख 60 हजारांवर मीटर उपलब्ध

गेल्या दोन वर्षांतील कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये विविध कंपन्यांकडून वीजमीटरचे उत्पादन थंडावले होते. यावर्षाच्या सुरुवातीपासून मीटर उत्पादनाला नियमित सुरूवात झाली आहे. निविदाअंतर्गत पुरवठादारांना तब्बल 15 लाख नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश गेल्या एप्रिल महिन्यात देण्यात आला आहे. त्यातून एप्रिलपासून आतापर्यंत 2 लाख 60 हजारांवर मीटर उपलब्ध झाले आहेत. याशिवाय येत्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 3 लाख 25 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहे.

सिंगल फेज नवीन स्मार्ट मीटरसाठी निविदा

कार्यादेशाप्रमाणे 75 हजार नवीन थ्रीफेजच्या मीटरचा पुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून सिंगल फेजच्या 12 लाख 80 हजार नवीन स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. तर पुढील काळात मीटरची वाढती मागणी पाहता आणखी 20 लाख सिंगल फेज मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 32 लाख 80 हजार नवीन वीजमीटर लवकरच टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.