आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला येथील गायत्री बालिकाश्रमात राहणाऱ्या दोन मुली येत्या ६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. लहानपणी कुटुंबापासून दुरावलेल्या मुलींना हक्काचे कुटुंब मिळणार आहे. निताली व मंगला आठ वर्षांपूर्वी बालिकाश्रमात दाखल झाल्या होत्या. निताली अहमदनगर येथे हरवली. तिने अकोला येथे आपले कुटुंब असल्याचे सांगितले. त्यानुसार तिला शहरात आणण्यात आले. प्रशासनाकडून नितालीच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. परंतु पत्ता लागला नाही.
त्यानंतर तिला गायत्री बालिकाश्रमात दाखल केले. येथे तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सोबतच शिवणकाम, संगणक आदींचे ज्ञान तिला आहे. भटकलेल्या, निराधार मुलींसाठी प्रशासनाकडून ऑपरेशन मुस्कान राबवण्यात येते.
याअंतर्गत निराधार मंगला बालिकाश्रमात दाखल झाली. तिनेही आश्रमातच राहून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यापूर्वी आश्रमातील चार मुलींचे लग्न झाले आहे. याच माध्यमातून भुसावळ येथील गाजरे आणि अकोल्याचे पाठक कुटुंब आश्रमाच्या संपर्कात आले. त्यांनी आपल्या मुलांकरिता आश्रमातील मुलींची मागणी घातली. या दोन्ही कुटुंबाची आश्रम संचालक मंडळाकडून संपूर्ण चौकशी करण्यात आली.
यात कुटुंब, मुलाची आर्थिक व समाजिक परिस्थिती आदींची सखोल माहिती घेण्यात आली. समाधानपूर्वक माहितीनंतर लग्नास होकार देण्यात आला. त्यानुसार ६ फेब्रुवारी रोजी आश्रमात नितालीचा अकोला येथील शुभम शामराव पाठक, तर मंगलाचा भुसावळचे सूरज लिलाधर गांजरे यांच्यासोबत विवाह ठरवण्यात आला आहे. दोन्ही मुले खासगी क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या आश्रमात दोन्ही लग्नाची तयारी जोमात सुरू आहे.
संपूर्ण चौकशीनंतर निश्चिती
यापूर्वी आश्रमातील चार मुलींचे लग्न आपण पार पाडले. या सर्व मुली त्यांच्या संसारात रमल्या असून, आनंदी आहेत. यंदा दोन मुलींचे लग्न जुळले. मुलांच्या कुटुंबाकडून लग्नाची मागणी आली. दोन्ही मुलं, त्यांचे कुटुंब याची परिपूर्ण चौकशी व आश्रमातील संचालक मंडळाच्या खात्रीनंतर लग्न समारंभ निश्चित केला. - वैशाली भारसाकळे, अधीक्षिका, गायत्री बालिकाश्रम, मलकापूर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.