आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची तिथीनुसार जयंती १० मार्च रोजी साजरी हाेणार आहे. डाबकी रोड परिसरात जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती समिती तथा डाबकी राेडवासी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात यंदा १०० फूट लांब व ५० फुट उंच भव्यदिव्य शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. जुने शहरातील जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती समितीतर्फे यंदा शिवनेरी किल्ल्याचे निर्माण करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच तीन दिवसीय सोहळ्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा पार पडणार असून, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक गोपालजी खंडेलवाल यांच्या हस्ते पार पडणार आहे. रात्री ८ वाजता बालगायिका नेहल ठाकूर व त्यांच्या चमुच्यावतीने स्वरसंध्या कार्यक्रमात पोवाडे, भावगीत, भक्तीगीते सादर केल्या जातील.
शिवव्याख्यानाचे आयोजन : शनिवार, ११ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रा.सतीष फडके यांचे शिवव्याख्यान आयोजित केले आहे. सायंकाळी साडेसात वाजता प्रतापगडावरील अफजलखान वधाचा प्रसंग बालकलाकारांच्या वतीने सादर केला जाणार आहे. रात्री ८ वाजता भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल.
राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज करणार शिवपूजन : राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात उभारलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवपूजन केले जाणार आहे. विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची उपस्थिती राहणार आहे. शोभायात्रेचा समारोप रात्री दहा वाजता शिवचरणपेठ स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ केला जाईल. अशीही मेजवानी : ९ ते ११ मार्च पर्यंत ऐतिहासिक व पौराणिक पुस्तकांचे स्टॉल, शिवरायांच्या प्रतिमा तसेच फोटो फ्रेम, पूजेचे साहित्य, शिवप्रेमींसाठी खाऊगल्ली तसेच चिमुकल्या मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी आणली जाणार आहेत.
शिवनेरी किल्ल्यावरील माती : किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्या मातीत ते खेळले बागडले, रायरेश्वराच्या साक्षीने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. अशा शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र माती तसेच राजधानी रायगडावर शिवछत्रपती म्हणून स्वराज्याभिषेक केला, जगदीश्वराच्या मंदिरासमोर देह ठेवला अशा रायगडावरील व राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे समाधी स्थळ असलेल्या पाचाड येथील पवित्र माती शिवप्रेमींच्या दर्शनासाठी ठेवली जाणार आहे.
डाबकी रोड परिसरात साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती : जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदा शिवजयंती उत्सवात १०० फूट लांब व ५० फूट उंच भव्यदिव्य शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.