आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून सुधाकर रामदास ढगे व राजेश रामभाऊ तायडे (दोघे रा. अकोला) या शिक्षकांची आमच्या गावात नियुक्ती आहे. क्वचितच दोघे एकत्र शाळेत यायचे. नाही तर आज हा तर उद्या तो अशी आळीपाळीने ड्यूटी करायचे. मुलं सकाळीच जाऊन तिष्ठत बसायची. गुरुजी मात्र तास-दोन तासांनी अकोल्याहून यायचे. शाळेच्या वेळेतही वर्गात झोपून राहायचे. आमचे गाव दुर्गम. यायला धड रस्ता नाही म्हणून इतर शिक्षक यायला कचरतात. कसे का होईना हे दोघे येतात म्हणून तरी मुलांचे शिक्षण सुरू आहे हा विचार करून आम्ही आजवर त्यांचे नखरे सहन केले. पण चिमुकल्या मुलींबाबत त्यांनी जो रानटी प्रकार केलाय ते एेकून मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. आम्ही दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले. नराधम तुरुंगात गेल्याचे समाधान आहे, मात्र आता आमच्या गावात दुसरे शिक्षक येतील का, की कमी पटसंख्येअभावी ही शाळाच बंद होईल, अशी भीती धामणदरी (ता. बार्शीटाकळी) येथील ग्रामस्थांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
अकोला व वाशिम जिल्ह्यांच्या सीमेवर वन विभागाच्या हद्दीत धामणदरी नावाची दाेन गावं. गाव कसलं? ३५ ते ४० घरांचा तांडाच. बंजारा व आदिवासी समाजाचीच सर्व घरं. लोकसंख्या ४०० ते ५००. पीडित मुलींच्या धामणदरी गावात जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा. बाकी मुलांना पुढील शिक्षणासाठी जवळच्या धाबा गावातील खासगी संस्थेत जावे लागते.
गावातील दोन खोल्यांच्या शाळेत एकूण नऊच विद्यार्थी. चार मुली व पाच मुले. चारही मुली चौथीत शिकतात. ढगे व तायडे या चौघींवर दोन महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने गावात जाऊन माहिती घेतली असता चारही मुलींचे पालक मानसिक धक्क्यात दिसले. गावात जायला धड रस्ता नाही. वन विभागाने काम करायचे की जिल्हा परिषदेने या वादात एका धामणदरीपासून दुसऱ्या धामणदरीपर्यंतचा ३ ते ४ किमीचा रस्ता रखडला आहे. ही खडकाळ वाट गुगल मॅपलाही चकवा देते इतकी िबकट आहे.
आम्ही गावात गेलो तेव्हा कोकणसारखी झोपडीवजा काही घरे दिसली. एका घरासमोर बरीच गर्दी होती. तिथे टिळ्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याच्या थोडेसे पुढे एका कुडाच्या घरासमोरील ओसरीवर पीडित मुलींचे कुटुंबीय बसले होते. सकाळीच आमदार हरीश पिंपळे येऊन गेले. फास्ट ट्रॅकवर खटला चालवू, असे आश्वासन देऊन गेले. खूप दिवसांनी आमदार आल्यामुळे गावकऱ्यांनी रस्ते व इतर समस्यांचीही जंत्री मांडली. त्यावर ‘लवकरच करू’ म्हणून आमदार साहेबांचा ताफा निघून गेला. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांचादेखील दोनदा फोन येऊन गेल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. काही जणांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना अनेकदा फोन करून या मुलींची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी त्यांच्या कार्यालयातून फोन आला व ‘काही अडचण असेल तर मेल करा, चार दिवसांत उत्तर मिळेल,’ असे उत्तर देऊन ‘बिझी’ मॅडमचे कर्मचारी मोकळे झाले. राज्याचे गृहमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून मात्र अजून चौकशी झाली नसल्याची खंत एका गावकऱ्याने व्यक्त केली.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वासुदेव पवार यांनी सांगितले, ढगे आणि तायडे दोघेही वयाची पन्नाशी ओलांडलेले असून त्यांना मुलांना शिकवण्यात अजिबात रस नव्हता. गावकऱ्यांशीही ते कधी संपर्कात राहत नव्हते. शालेय समितीच्या बैठकाही क्वचित व्हायच्या. मी पाठपुरावा करून शाळेला ७५ हजारांचा डिजिटल बोर्ड मिळवून दिलाय, पण तो दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. आता हे दोघे बडतर्फ झाले. त्यांच्या जागी १५ दिवस वेगवेगळे शिक्षक डेप्युटेशनवर येतील असे अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे. पण आता या शाळेमध्ये घाबरलेल्या मुलींना धीर देण्यासाठी किमान एक तरी महिला शिक्षिका हवी, अशी आमची मागणी आहे. आरोपी ढगेचे रेकॉर्ड पूर्वीपासूनच खराब असल्याचे आता लोक सांगत आहेत. यापूर्वी देखील एका गावात त्याने असाच ‘कारनामा’ केला होता, पण त्या वेळी गुन्हा दाखल झाला नसल्याने त्याने पुन्हा असे ‘धाडस’ केले आहे.
आरोपींना वेळीच ताब्यात घेतले नसते तर गावकऱ्यांनी बदडले असते
बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय साेळंके म्हणाले, ‘दोन्ही शिक्षकांनी अमानुष प्रकार केल्याचे आम्हाला गावातील रहिवासी असलेल्या होमगार्डमार्फत कळाले. आम्ही प्रसंगावधान राखत फिर्याद दाखल होण्याची प्रक्रिया होण्यापूर्वीच ढगे व तायडे यांना ताब्यात घेतले. याचे कारण म्हणजे जर त्यांना गावातून इकडे आणले नसते तर संतप्त गावकऱ्यांनी त्यांना तिकडेच बेदम मारहाण केली असती. आरोपींनी गुन्हा कबूल केला नसला तरी चौकशीत त्यांनी चिमुकल्या मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचे मात्र अप्रत्यक्षरीत्या मान्य केले आहे. मुलींचे कपडे बदलण्याचे, केस विंचरून देण्याचे काम आम्ही करत असू, असे आरोपी सांगत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.