आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजड वाहनामुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघाताची मालिका लक्षात घेता मलकापूर परिसरातील दिवसाची जड वाहतूक बंद करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी मलकापूर परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. त्या स्वाक्षऱ्यांचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाला दिले आहे. काही दिवसांपूर्वी मलकापूर परिसरात टिपरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. या परिसरातील दिवसभर सुरु असलेली जड वाहतूक ही नागरिकांच्या जीवावर उठली आहे.
ती बंद करून रात्री दहा वाजतानंतरच सुरु करावी, ही वाहतूक पर्यायी रस्ता येवता रेल्वे गेट एमआयडीसी येवता रोड मार्गे वळवण्यात यावी, मलकापूर शाळा परिसरात व मलकापूर हायवेच्या पुलाजवळ गतिरोधक बसवण्यात यावे, राष्ट्रीय महामार्ग हायवे जवळील पर्यायी रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, जड वाहनांना रात्री १० नंतरच मलकापूर परिसरातून परवानगी देण्यात यावी, संत तुकाराम चौक ते कोठारी खदान पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करावे, खनिकर्म निधी अंतर्गत हा रस्ता करावा, शहरातील विविध चौकात बंद पडलेले सिग्नल लावावे, अशा मागण्यांचे नागरिकांच्या सह्याचे निवेदन जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, आरटीओ यांना दिले आहे. या निवेदनावर उचित कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.