आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाद्याच्या शोधात नागोबा एका घरात शिरले, भिंत आणि टिनपत्र्याच्या आडोसा घेऊन फिरू लागले. मात्र भिंतीवर ठेवलेल्या चिकट टेपच्या रिंगमध्ये नागोबा अडकले. फण्यानंतरच्या भागात टेपचे रिंग घट्ट फसले. भला माेठा फणा आणि पाच फूट लांबीच्या नागोबांची ही अवस्था पाहून घरातील लोक भयभीत झाले. तत्काळ सर्पमित्रांना बोलावण्यात आले. त्यांनी मोठ्या शिताफीने रिंगमध्ये अडकलेल्या सापाला मोकळे केले. ही घटना बोरगाव मंजू येथील अमोल मोझाडे यांच्या घरात घडली. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू येथे अमोल मोझाडे यांच्या घरात बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास भिंतीवर नाग दिसून आला.
हा नाग टेपच्या रिंगमध्ये अडकलेला हाेता. चवताळलेल्या अवस्थेत सापाला पाहून घरातील सदस्य भयभीत झाले. अमोल मोझाडे यांनी तत्काळ पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सर्पमित्र कुमार सदांशिव यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर कुमार सदांशिव, सूरज सदांशिव, प्रफुल्ल सदांशिव, राजेश रायबोले, प्रशांत चोरपगार, संदीप शेगोकार, सुनील राजूरकर, स्वप्निल वानखडे आदी घटनास्थळी पोहोचले. नाग टीनपत्रे आणि भिंत यामधील जागेत बसलेला असल्याने त्याला पकडणे कसरतीचे ठरते, अखेर मोठ्या शिताफीने या सापाला ताब्यात घेऊन त्याची टेपच्या रिंगमधून सुटका केली.
अशी केली सुटका
टेपची रिंग सापाच्या शरीरात फसलेली असल्याने ती ना मागे जात होती ना समोर. त्यामुळे सापाला त्यामधून सोडवणे जिकिरीचे होते. सर्पमित्र कुमार सदांशिव आणि सूरज सदांशिव यांनी प्लास्टिकची रिंग कापून काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी एकाने सापाने पकडून धरले, तर दुसऱ्याने ब्लेडच्या सहाय्याने रिंग कापली. अशावेळी ब्लेडमुळे सापाला दुखापत होण्याचीही भीती होती. त्यामुळे ही मोहीम जोखमीची आणि वेळखाऊ ठरली. अखेर सापाची सुरक्षित सुटका झाली, असे सर्पमित्रांनी सांगितले.
सर्पदंश होण्याची भीती असल्याने जिकिरीची मोहीम
टेपच्या रिंगमध्ये अडकलेला नाग चवताळलेला होता. शिवाय अडचणीची जागा असल्याने नागाला सुरक्षित पकडणे कसरतीचे ठरले. अशा अवस्थेत हा नाग अन्न सुद्धा खाऊ शकत नव्हता. टेपची रिंग कापून सापाला मोकळे करण्यात आले. हे करणे जिकिरीचे होते. कारण अशा स्थितीत सर्पदंश होण्याचा धोका असतो.
- कुमार सदांशिव, सर्पमित्र.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.