आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:पहिल्याच पावसात त्रेधातिरपिट; रस्ते, सखल भाग झाले जलमय

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिल्याच पावसात शहराच्या विविध भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. अनेक भागात रस्ते खोलगट, रस्त्यालगत नाल्या नसल्याने ही समस्या उद्भवली. त्यामुळे नागरिकांना साचलेल्या पाण्यातून जाणे-येणे करावे लागत असल्याने त्रास सहन करावा लागला. शहरात अनेक मुख्य मार्गाचे काँक्रीटीकरण झाले आहे. नव्याने झालेले काँक्रीटचे रस्ते उंच आहेत. त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचत नाही. मात्र जुन्या काँक्रीटच्या रस्त्यावर पाणी साचते. नागरिकांची घरे उंच, रस्ते खोल अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी छतावरील पावसाचे पाणी शोष खड्डा करुन जमिनीत न जिरवता रस्त्यावर सोडले. तर दुसरीकडे रस्त्यालगत नाल्या बांधलेल्या नाहीत. शहरातील विविध भागातील गल्ली बोळीत ही स्थिती तर आहे तसेच काही मुख्य मार्गावरही पाणी साचले आहे.

जुने शहरातील डाबकी रोड, रेणुका नगर, कॅनॉल रोड परिसर, गोडबोले प्लॉट, शिवसेना वसाहत, बापू नगर, आश्रय नगर, खडकी परिसर, मलकापूर परिसर आदी विविध भागातील मार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने अनेक दिवस हे पाणी रस्त्यावर साचलेले असते. ज्येष्ठ नागरिक, महिला विद्यार्थ्यांना या साचलेल्या पाण्यातून जाणे-येणे करावे लागते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

अकोला तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
जिल्ह्यात शनिवारी, ११ जूनला सायंकाळनंतर झालेल्या पावसाची एका दिवसात १२.५ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २५.६ मिमी पाऊस हा अकोला तालुक्यात झाला आहे.

सर्वात कमी पाऊस पातूर तालुक्यात झाला आहे. यापूर्वी गुरुवारी ९ जूनला जिल्ह्यात झालेल्या पावसाची ३.४ मिलिमीटर नोंद झाली होती. त्या वेळी अकोला तालुक्यात सर्वाधिक ६.६ मिमी पाऊस झाला होता. दरम्यान जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान खरीप हंगामासाठी शेताची पेरणीपूर्व मशागत आटोपून तयार असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पाऊस सुरु झाल्यामुळे बाजारपेठेतील शेतकऱ्यांची लगबग वाढली असून, बि-बियाणे खरेदीसाठी गर्दी होत आहे.

३२.३ टक्के पाऊस
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत १७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत ३२.३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी आजपर्यंत ३८.४ म्हणजे सरासरीच्या तुलनेत ७०.१ टक्के पाऊस झाला होता.

बातम्या आणखी आहेत...