आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला:अडीच वर्षाच्या चिमुकलीने पाठ केले दोनशे देशांचे ध्वज, राजधान्यांची नावे

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खेळातून अभ्यास : वैदिशा शेरेकर हिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

येथील वैदिशा शेरेकर या अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीने खेळण्या-बागडण्याच्या वयात तब्बल दोनशे देशांच्या राजधान्यांची नावे मुखपाठ केली आहेत. विविध देशांच्या राष्ट्रध्वजांचीही तिला ओळख असून तिच्या या बुद्धिमत्तेबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये काही दिवसांपूर्वी नोंद करण्यात आली.

वैदिशा ही मूळची अकोल्याची रहिवासी आहे. तिचे वडील वैभव शेरेकर हे एका बँकेत अधिकारी असून सध्या ते चंद्रपुरात कार्यरत आहेत. वैदिशा या अडीच वर्षांच्या चिमुकलीला जगातील दोनशेहून अधिक देशांच्या राजधान्यांची नावे मुखपाठ आहेत. केवळ राजधान्यांची नावेच नाही तर विविध देशांच्या राष्ट्रध्वजांचीही तिला ओळख आहे. तिच्या या बुद्धिमत्तेची इंडिया बुक ऑफ रेकार्डने दखल घेतली आहे. वैभव आणि पत्नी दीपाली यांना वैदिशा ही एकुलती एक मुलगी आहे. मुलीच्या अभ्यासाच्या दृष्टीने विविध प्राणी, पक्षी, पालेभाज्या फळभाज्यांचे चार्ट वैभव यांनी घरी आणले होते. या चार्टच्या माध्यमातून तिला अभ्यासात गोडी निर्माण झाली. काही दिवसातच तिने विविध प्राणी, पक्षी आणि भाज्यांची नावे पाठ केली. दिवसेंदिवस होत असलेली तिची अभ्यासातील प्रगती शेरेकर दांपत्याने ओळखली. वैभव शेरेकर यांनी सुरुवातीला तिला मोबाइलमध्ये विविध देश, त्यांची राजधानी, ध्वज याबाबत माहिती दिली. काही दिवसांनी तिला पुन्हा या बाबी दाखवण्यात आल्या तेव्हा न चुकता तिने विविध बाबी ओळखल्या. त्यानंतर विविध देशांच्या माहितीविषयीचे चार्ट त्यांनी आणले. काही दिवसातच तिने सुमारे दोनशे देशांबद्दलची माहिती पाठ केली. वैदिशाची बुद्धिमत्ता पाहून तिच्या मावशीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यास सुचवले. त्यानुसार कुटुंबीयांनी तिची माहिती आणि व्हिडिओ पाठवले. त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली.

अभ्यासात रुची
वैदिशा हिची अगदी बालपणापासून अभ्यासात रूची दिसत आहे. खेळाच्या माध्यमातून तिला अभ्यासाची सवय लागली आहे. अभ्यासाचे चार्ट काही दिवसातच ती पाठ करते. तिच्या पाठांतराची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. - अशोक आंबेकर, आजोबा.