आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 टक्के भाग गुंठेवारीचा:प्रस्ताव ऑफलाइन स्वीकारण्यास दोन दिवस मुदत

अकोला11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंठेवारीचे नियमानुकूलचे प्रस्ताव ऑनलाइनऐवजी ऑफलाइन स्वीकारण्यासाठी आता केवळ दोन दिवस राहिले आहेत. ऑफलाइनने शुक्रवार २५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार असून, त्या नंतर हे प्रस्ताव ऑनलाइन स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे दोन दिवसात नागरिकांनी गुंठेवारी नियमानुकूलचे प्रस्ताव ऑफलाइन सादर करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लोकसंख्या वाढल्याने शेती अकृषक करुन प्लॉट पाडण्यात आले. प्लॉट पाडताना कोणतेही नियम नव्हते, त्यामुळे मोकळी जागा, नाल्या, रस्ते, पथदिवे आदी कोणत्याही सुविधा उपलब्ध न करता या प्लॉटची विक्री करण्यात आली. मात्र १९६५ मध्ये महाराष्ट्र नगररचना अधिनियम अस्तित्वात आले. त्यानंतर शेती अकृषक करताना ती नियमाने करावी लागली. मात्र ग्रामिण भागात हा नियम तुलनेने लागू झाला नाही. त्यामुळे गुंठेवारी पद्धतीचे प्लॉट हे सर्वच शहरात आहेत. महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर गुंठेवारी पद्धतीच्या भागात वाढ झाली. तूर्तास जवळपास ३५ टक्के भाग गुंठेवारीचा आहे. २०१४ पासून महापालिकेने गुंठेवारीचे नियमानुकुल करणे बंद केले होते. मात्र २०२० मध्ये राज्य शासनाने गुंठेवारी नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्या नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२० पूर्वी गुंठेवारीचे प्लॉट अथवा घर घेतले असेल त्यांना गुंठेवारी नियमानुकूल करण्याचा मार्ग मोकळा झाला.

मात्र त्याच वर्षी बांधकामाचा नकाशा मंजुरीसाठी ऑफलाइन पद्धत बंद करुन बिल्डिग प्लॅन मॅनेजमेन्ट सिस्टिम (बीपीएमएस) सुरू करण्यात आली. बीपीएमएस पद्धतीने गुंठेवारीची फाइल सबमिट करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या.

दरम्यान यात पंतप्रधान आवास योजनेत ज्या गुंठेवारी पद्धतीच्या प्लॉट धारकांचे घरकुल मंजुर झाले. त्यांचे प्लॉटही नियमानुकूल करताना अनेक महिन्यांचा कालावधी गेला. या सर्व बाबी लक्षात घेवून महापालिकेने गुंठेवारी प्लॉटचे तसेच गुंठेवारी प्लॉटवर बांधलेल्या घराचे नियमानुकूल ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

२५ पर्यंत प्रस्ताव स्वीकारणार
शुक्रवार २५ नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइनने प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. यासाठी खुल्या प्लॉटसाठी रेडिरेक्नर दराच्या ०.५ टक्के विकास शुल्क, या विकास शुल्काच्या तीनपट प्रशमन (दंड) आकारला जाईल. जर बांधकाम असेल तर बिल्डअप एरीयाचे रेडिरेक्नर दराच्या २ टक्के विकास शुल्क आणि विकास शुल्काच्या तीन टक्के प्रशमन (दंड) आकारला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...