आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉझिटिव्ह:शहरातील दोन अहवाल गोवर पॉझिटिव्ह

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईसह विविध भागात गोवरचे रुग्ण आढळत असतानाच आता अकोला शहरातही संदिग्ध रुग्णांपैकी दोन रुग्णांना गोवर होऊन गेला आहे. पंधरा दिवसांपूर्वी चाचणीसाठी पाठवलेले दोन नमुने १ डिसेंबरला पॉझिटिव्ह आढळून आले. दोन्ही रुग्ण शहरातील रहिवाशी असून, एकाचे वय आठ महिने तर दुसऱ्याचे अकरा वर्षे आहे. संबंधितांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी लक्षणे होती. आता त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

गोवरचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागाने सतर्कतेच्या सूचना देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर ताप आणि अंगावर पुरळ असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन संदिग्ध रुग्णांचे रक्तजल नमुने चाचणीसाठी घेतले जात आहेत. हे नमुने मुंबई आणि पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात येतात. गेल्या दोन आठवड्यात पाठवलेल्या नमुन्यांची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. त्यापैकी दोन अहवाल गोवरसाठी पॉझिटिव्ह आले. हे रुग्ण रिकव्हर झाले असून, त्यांच्या घरी आहेत. अकोला शहरात आतापर्यंत ५ हजार ९०८ बालकांना गोवरचा पहिला डोस दिला गेला आहे. त्यापैकी ५ हजार २२३ जणांचे दुसऱ्या डोसचे लसीकरणही झाले आहे.

लसीकरण सुरू
आतापर्यंत आढळलेल्या गोवर संदिग्धांपैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आलेत. दोघांची प्रकृती ठीक आहे. गोवरच्या पार्श्वभूमीवर लसीकरण न झालेल्या बालकांचा सर्व्हेच्या माध्यमातून शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.- डॉ. अनुप चौधरी, बालरोगतज्ज्ञ, मनपा

ग्रामीण भागात १४ संदिग्ध
मनपाच्या हद्दीत आतापर्यंत ३५ मुलांमध्ये गोवरशी संबंधित लक्षणे आढळली. या मुलांना गोवर संदिग्ध गृहित धरून त्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. मनपा वगळता जिल्ह्यातून १४ संदिग्ध रुग्ण आढळले आहेत, असे एकूण ४९ संदिग्ध आतापर्यंत जिल्ह्यात आढळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...