आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणेला आव्हान;:असुरक्षित प्रवासी : रेल्वेने जाताय मोबाइल, अन्य वस्तू सांभाळा

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेस्थानकावर तसेच रेल्वेमध्ये कोणाचा मोबाइल तर कोणाची पर्स, बॅग चोरीला जाण्याच्या घटना दररोज घडत आहेत. रात्रीच्या वेळी तर प्रवासी स्वत:ला असुरक्षित समजतो. सुरक्षा यंत्रणा असताना रेल्वेस्थानक तसेच गाड्यांमध्ये चोरट्यांची हिंमतच कशी होते? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त का होत नाही? त्यामागचे गुपित काय? असे अनेक प्रश्न त्याअनुषंगाने उपस्थित होत आहेत.

अकोला रेल्वेस्थानकावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी लोहमार्ग पोलिस ठाणे आहे. तर गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे सुरक्षा बलावर आहे. दोन्हीकडे मॅनपॉवरही आहे. मात्र, असे असताना रेल्वेस्थानकाचा परिसर हा चोरट्यांचा अड्डा बनत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

रेल्वेच्या तिकिट काउंटरवर प्रवाशांचे मोबाइल चोरणे, फलाटावर मोबाइल, पर्स चोरीच्या घटना आणि रेल्वेमध्ये सुद्धा मोबाइल आणि बॅग चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. येथील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम काही वर्षापूर्वी झाले होते. मात्र, आता पुन्हा रेल्वेस्थानक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. दररोज लोहमार्ग पोलिसांत एक-दोन चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. रेल्वे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा बल ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यात कुठे कमी पडते, याविषयी वरिष्ठांनी वर्ग घेण्याची गरज असून भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

रेल्वेतून मोबाइल चोरीच्या घटना सर्वाधिक
रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे सामान चोरीला जाण्याच्या गुन्ह्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामध्ये काही चोरीच्या घटना अकोला हद्दीच्या बाहेरच्याही आहेत. मात्र, रेल्वेतील चोऱ्या या रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत. त्यानंतर चोरीच्या घटना स्थानकावरील फलाटांवर व परिसरात अधिक आहेत. यामध्ये सर्वाधिक घटना या मोबाइल चोरीच्या आहेत.

३६ दिवसांत चोरीचे ४० गुन्हे दाखल
१ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान लोहमार्ग पोलिसांत चोरीचे ४० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही गुन्हे अकोला हद्दीच्या बाहेरील आहेत. मात्र सर्वाधिक गुन्हे अकोला लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या हद्दीतील आहेत.

तिकिट काढताना खिशातून मोबाइल चोरी
सोमवारी सायं. तिकिट काढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ओमप्रकाश चांडक (वय ७०) यांच्या खिशातील मोबाइल पळवला. विशेष म्हणजे, गर्दीच्या वेळेस याठिकाणी एकही पोलिस तैनात राहत नसल्याने चोरट्यांचे फावते.

बातम्या आणखी आहेत...