आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मी सोशल मीडियापासून लांब राहिलो. अभ्यासात सातत्य ठेवले. पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण होऊ, असे ठरवले होते. या कालावधीत अभ्यासावर लक्ष केंद्रीत करून मला या पायरीपर्यंत पोहोचता आले.’ युपीएससीमध्ये उत्तीर्ण झालेले अकोल्यातील अश्विन राठोड यांनी हा यशाचा मंत्र सांगितला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला असून, अकोल्याच्या कीर्ती नगरमधील रहिवासी अश्विन बाबुसिंग राठोड यांनी वयाच्या २५ व्या वर्षी या परीक्षेत उत्तीर्ण होत ५२० वा रँक मिळवला आहे. यामुळे आयपीएस किंवा आयआरएस म्हणून निवड होणार असल्याचे अश्विन यांनी सांगितले.
शनिवारी, २५ सप्टेंबरला त्यांनी ‘दिव्य मराठी’समोर येथपर्यंतची वाटचाल मांडली. राठोड कुटुंबिय हे मूळचे पातूर तालुक्यातील शेकापूर येथील. बाबुसिंग राठोड पोलिस विभागात नोकरीला असल्याने २२ वर्षांपूर्वी अकोल्यात स्थायिक झाले. वाशीम येथून पीएसआय म्हणून काही महिन्यांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले.
दुसऱ्या प्रयत्नाचा विचार नव्हता
पहिल्याच प्रयत्नात मी केंद्रीय लाेकसेवा आयाेग (सिव्हील सर्व्हिसेस) चा विचार केला होता. दुसरा पर्याय विचारातही ठेवला नाही. कारण दुसऱ्या पर्यायाचा विचार हा आपल्या उत्साहाला विचलित करणारा असतो. पण दुसरा पर्याय घ्यावा लागला. पहिल्यांदा झालेल्या लहान-सहान चुका सुधारल्या अन यशस्वी झालो. पण दुसऱ्या प्रयत्नात यश न आल्यास काहीतरी नोकरी करण्याचा विचार होता. कोविडमुळे दिल्लीहून इकडे आलो. काही दिवस ताईकडे नांदेडला राहून तयारी केली.
महिन्यांतून दोन चित्रपट पाहत होतो
अभ्यासाच्या डिसेंबर २०१८ ते मार्च २०२० दरम्यान मी सोशल मीडियापासून लांब होतो. चित्रपट पाहिल्या शिवाय मात्र मला राहवत नाही. महिन्यात एक ते दोन चित्रपट पाहत होतो.
बारा ते पंधरा तास केला अभ्यास
दररोज मी आठ ते दहा तास अभ्यास केला. पूर्व परीक्षा जशी जवळ आली तसे अभ्यासाचे तास वाढवले बारा ते पंधरा तास अभ्यास झाला. मुख्य परीक्षेसाठी आणखी तास वाढवावे लागले. सकाळी सहा ते रात्री ११ पर्यंत माझे अभ्यासाचे नियोजन ठरलेले असायचे, त्यामध्ये सातत्य ठेवत होतो. माझ्यावर मुलाखतीपूर्वी निश्चितच दडपण होते. पण मुलाखत देताना मला कठीण जाणवले नाही. ३५ मिनीटे माझी मुलाखत झाली होती. - अश्विन राठोड, कीर्ती नगर अकोला.
आई-वडिल म्हणत असत डॉक्टर हो
वडील बाबुसिंग, आई ललीता सांगतात की, अश्विन दहावीत होता, तेव्हा त्याने एमबीबीएस करून डॉक्टर व्हावे, अशी आमची इच्छा होती. पुढे त्याने वैद्यकीय प्रवेश परीक्षाही दिल्या. मात्र पदवीनंतर तो युपीएससीच्या तयारीकडे वळल्याने. त्याच्यावर आम्ही आमच्या अपेक्षा लादल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.
इयत्ता दहावीपर्यंत अकाेल्यात शिक्षण
अश्विन राठोड यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण अकोल्यात झाले. अकरावी, बारावीत ते नागपूरात होते. बीएससी ची पदवी नागपूरातच पूर्ण केली. यात सहाही सेमिस्टारमध्ये मी टॉप होतो. जून २०१८ पासून ते युपीएससीच्या तयारीला लागले. २०१८ ते २०१९ मध्ये दहा महिने मी दिल्लीला होतो. तेथे क्लासेस करून तयारी केली, असे त्यांनी सांगितले.
गोर सीकवाडी गोर सेनेच्या वतीने आश्विनचा सत्कार
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अश्विन राठोडने घवघवीत यश मिळवल्याने समाजातील सर्वच स्तरांतून त्यांचा स्वागत करण्यात येत आहे. गोर सीकवाडी आणि गोर सेना अकोला जिल्हाच्यावतीने अश्विन व त्यांच्या आई वडीलांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गोर सीकवाडी जिल्हा सहसंयोजक रविंद्र जाधव, गोर सेना अकोला जिल्हाध्यक्ष रतन आडे, अॅड. आकाश राठोड, डाबकी रोड नगरीचे नायक प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.