आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर राहात असल्यामुळे उपचासांसाठी येणाऱ्या रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार, ४ मार्च रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला संताप व्यक्त केला.
नागपूर-मुंबई महामार्गावर वसलेल्या सुलतानपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मीती करण्यात आली आहे. या केंद्राला परिसरातील अनेक खेडी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे सुलतानपूरसह अनेक गावातील विविध आजाराचे रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात. गावातुन महामार्ग गेल्यामुळे या महामार्गावर अपघाताच्या घटना सुध्दा घडतात. त्यामुळे प्रथमोपचार करण्यासाठी जखमीला येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात येते.
परंतु आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे नाइलाजास्तव रुग्णास खासगी दवाखान्यात किंवा इतरत्र हलवण्यात येत आहे. दरम्यान शनिवार, ४ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यानंतरही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे उपचासांसाठी आलेल्या रुग्णांना आल्या पावली परत जावे लागले. त्यामुळे कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच रुग्णाची होणारी हेळसांड थांबवून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ‘वंचित’चे नागवंशी संघपाल पनाड, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, अतीष पनाड, संतोष पनाड, किरण पनाड, राजहंस जावळे, विशाल पनाड, भूषण जावळे, रमेश पनाड यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.