आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गण गण गणांत बोत:‘विठ्ठलाचे नाम माऊलीच्या ओठी’;दर्शनासाठी गर्दी

अकोला23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विठू माऊली, तू माऊली जगाची, पंढरीचा वारकरी वारी चुकू न देई कधी, राम कृष्ण हरी..., विठ्ठला..विठ्ठला..अशा नामगजरासह ‘श्रीं'ची पंढरपूरला निघालेली पालखी अकोल्यामध्ये पोहोचली. बुधवारी ८ जूनला सकाळी सहा वाजता डाबकी रोड येथे पालखीचे आगमन झाले. दिवसभर विविध मार्गाने जात दुपारी ३ वाजता हा पालखी सोहळा मुक्कामस्थळी पोहोचला. कोरोनामुळे दोन वर्षानंतर पालखी अकोल्यामध्ये दाखल झाली. यामुळे महाराजांच्या भक्तांनी ठिकठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

दिवसभराचा प्रवास करीत उन्हामुळे एक तास पूर्वी पालखी मुक्कामस्थळी पोहोचली. या वेळी आरती, पूजन झाले. मुंगीलाल बाजोरीया विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी ४ ते रात्री ११ वाजतापर्यंत भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. येथे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

विविध संस्था, संघटनांकडून स्वागत : खंडेलवाल अलंकार समोर खंडेलवाल परिवाराच्यावतीने पालखीचे पूजन, वारकऱ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. या वेळी आमदार वसंत खंडेलवाल, पुष्पा खंडेलवाल, भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, सुनीता अग्रवाल, मदनलाल खंडेलवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनेच्या वतीने गांधी चौक येथे युवक काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले. संतोष हुशे, हरिष आलिमचंदानी यांनीही पालखीचे स्वागत केले.

शहरातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात अमन चावला, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंटचे अध्यक्ष उमेश बागडिया, भावेश जोशी, बालकिसन अग्रवाल, अनिल तापडीया, गोपाल अग्रवाल, पुनम चव्हाण, उषा विरक यांनी स्वागत केले. दरम्यान पालखीच्या आगमनाने शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. पालखीच्या मार्गावर भाविकांनी सडा, रांगोळ्या रेखाटल्या होत्या. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्धांनी माेठ्या संख्येने ठिकठिकाणी गर्दी केली होती. याशिवाय विविध स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भाविकांना विविध खाद्यपदार्थांचे वाटप केले.

हजारो भाविकांनी घेतले दर्शन
पहिल्या दिवशी डाबकी रोडवरून पालखी सकाळी ९ वा. खंडेलवाल शाळेत पोहोचली. डाबकी रोड येथे पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली होती. या वेळी सुरक्षा रक्षकांना भविकांना आवरणे कठीण झाले होते. पुढे विठू नामाच्या गजरामध्ये पालखी मार्गस्थ झाली. कस्तुरबा हॉस्पिटल, विठ्ठल मंदिर, लोखंडी पूल, सिटी कोतवाली, गांधी चौक, खुले नाट्यगृह, निशांत टॉवर जवळील गल्लीतून जात मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात मुक्कामस्थळी पोहोचली.

पाणी, फराळ, आईस्क्रीम, महाप्रसाद वाटप
मार्गावर विविध ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी मार्गा-मार्गावर वारकऱ्यांसाठी पेज, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हामुळे अनेक ठिकाणी थंडपेय व आयस्क्रीमची व्यवस्था करण्यात आली होती. लोखंडी पूल, सिटी कोतवाली, गांधी चौक , खुले नाट्यगृह येथे विविध संस्था, संघटनेच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पालखीचा आजचा मार्ग असा
मुंगीलाल बाजोरीया विद्यालयातून टपाल कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरून, अशोक वाटिका चौक, खंडेलवाल भवनसमोरून नेहरू पार्क जवळून जुने इन्कम टॅक्स चौक, पंत मार्केट समोरून, आदर्श कॉलनी शाळा क्रं. १६ मध्ये सकाळी ९ ते १२, तेथून पुढे बोबडे डेअरी जवळून सिंधी कॅम्प मार्गे जेल चौक, अशोक वाटिकेमागून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून, सरकारी बगीचा, खोलेश्वर, सिटी कोतवाली, जयहिंद चौक, श्री राजेश्वर मंदिरा समोरून पालखी हरिहर पेठ मुक्कामी जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...