आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:जिल्ह्यात तीन प्रकल्पात जलसाठा; मात्र शेतकरी सिंचनापासून वंचित

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील तीन नवीन प्रकल्पात जलसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र या प्रकल्पातून सिंचनाला पाणी देण्याची व्यवस्था नसल्याने १२ हजार ५२० हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा कोणताही फायदा झालेला नाही.जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह विविध भागात बॅरेज, लघु प्रकल्प, संग्राहक तलाव, जल प्रकल्प आदी ११ प्रकल्पाचे काम सुरू आहे. यापैकी शहापूर बृहत, नेरधामणा, घुंगशी या तीन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या प्रकल्पात जलसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु या जलसाठ्यातून सिंचनासाठी पाणी सोडता येत नसल्याने हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित राहिलेली आहे. अकोट तालुक्यातील शहापूर बृहत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाची साठवण क्षमता ७.७९ दलघमी असून, १ हजार ३७३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. कालवा पद्धतीने शेतकऱ्यांना पाणी दिले जाणार आहे. तेल्हारा तालुक्यातील पूर्णा नदीवरील नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ८.१८ दलघमी आहे. या प्रकल्पातून बाळापूर, अकोला, अकोट, तेल्हारा या तालुक्यातील ३२ गावांमधील ४६४२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी बॅरेजचेही कामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता १७.४५ दलघमी असून, या प्रकल्पामुळे ६ हजार ३४३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मात्र प्रकल्पात पाणी साठवण झाली असली तरी विविध कारणांमुळे अद्यापही सिंचनासाठी पाणी देता येत नाही.

शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही
हे प्रकल्प खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी बांधले या भागात शेतकऱ्यांना खरीप पिकावरच अ‌वलंबून राहावे लागते. त्यामुळे खारपाणपट्ट्याला रोखता यावे, यासाठी हे प्रकल्प बांधले. त्याचे काम पूर्ण झाले. जलसाठा झाला. मात्र सिंचनासाठी पाणी देता येत नसल्याने येथील शेतकऱ्यांना प्रकल्पांचा फायदा झालेला नाही.

सिंचनासाठी आता उजाडणार २०२५
घुंगशी बॅरेजचे पाइप टाकण्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. मात्र नेरधामणा, शहापूर बृहत या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी किमान दोन ते तीन वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळेच या प्रकल्पातून सिंचनासाठी शेतकऱ्यांना २०२५ ची वाट पाहावी लागणार आहे.

प्रकल्पाचे काम पूर्ण पण जलसंचय नाही
बाळापूर तालुक्यात मन नदीवर कवठाजवळ बॅरेजचे काम पूर्ण झाले. मात्र त्यामध्ये पाणी साठवल्यास लोहारामार्गे शेगावकडे जाणारी वाहतूक ठप्प होणार आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत झाला. त्यामुळे जोपर्यंत पूल बांधला जात नाही. तो पर्यंत पाणी साठवता येत नाही. त्यामुळे १ ७२२ हेक्टर जमीन सिंचनापासन वंचित आहे.

सिंचन न हाेण्याची कारणे:
नेरधामणा प्रकल्पातून पाइपमधून सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. मात्र अद्याप पाइप टाकण्यासाठीच्या निविदा प्रसिद्ध झालेल्या नाहीत. घुंगशी प्रकल्पातूनही पाइपमधून सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. पाइप टाकण्याच्या कामास सुरुवात झाली असली तरी अद्याप पाइप टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही.शहापूर बृहत प्रकल्पातून कालव्याच्या माध्यमातून पाणी दिले जाणार आहे. मात्र अद्याप कालव्याचे काम रखडलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...