आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअशोक वाटिका चौकात उड्डाण पुलाच्या पिल्लरखाली असलेली 450 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटल्याने शहरातील सहा जलकुंभाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दुरुस्तीच्या कामाला चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
अकोला पाणी पुरवठा योजनेचे महान येथे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या जलशुद्धीकरण केंद्रातून 25 एमएलडी आणि 65 एमएलडी असे दोन केंद्र आहेत. 25 एमएलडी क्षमतेच्या केंद्रातील 450 मिमी व्यासाची जलवाहिनी अशोक वाटिके जवळून जाते. ही जलवाहिनी उड्डाणपुलाच्या पिल्लरच्या खालून गेलेली आहे. याच ठिकाणी नेहरु पार्क चौकातील जलकुंभातील 350 मिमी व्यासाची जलवाहिनी गेलेली आहे. ही जलवाहिनी मागील साडेतीन महिन्यापासून फुटलेली आहे. ही फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम 17 डिसेंबरला सुरु करण्यात आले होते. या जलवाहिनीची दुरुस्ती करताना अथवा अधिक दाबामुळे पिल्लर खालून गेलेली 450 मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहरातील सहा जलकुंभाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
या जलकुंभाचा पाणी पुरवठा झाला विस्कळीत
नविन बसस्थानका मागील दोन, जुने शहरातील शिवनगर येथील दोन, आश्रय नगर येथील एक आणि शिवणी भागातील एक अशा सहा जलकुंभाना 25 एमएलडी वरुन पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटल्याने या सहा जलकुंभाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
50 ते 60 मिटर जलवाहिनी बदलावी लागणार
उड्डाणपूलाचे काम करण्यापूर्वीच पिल्लर खालून गेलेली जलवाहिनी बदलणे गरजेचे होते. मात्र त्यावेळी जलवाहिनी बदलण्याचे काम झाले नाही. पिल्लर खाली जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीचे काम करणे अवघड आहे. त्यामुळे थेट 50 ते 60 मिटर नविन जलवाहिनी टाकावी लागणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली.
सकाळी चार वाजता निदर्शनात आली बाब
पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता तुषार टिकाईत हे नागपूर येथून अकोल्यात येत असताना पहाटे चार वाजता जलवाहिनी फुटल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्वरीत महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात संपर्क साधून 25 एमएलडी वरील पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा अपव्यय टळला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.