आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घडवलेले गणेश:‘आम्ही मांडणार स्वत: घडवलेले गणेश

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहीले आहे. सध्या पर्यावरणपूरक गणेश उत्सवाकडे भक्तांचा कल वाढला आहे. याच उद्देशातून अकोल्यामध्ये रविवारी शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा जानोरकर मंगल कार्यालय रिंगरोड येथे आयोजित केली हाेती. या कार्यशाळेत ७०० वर चिमुकले व त्यांच्या पालकांनी सहभाग घेत मातीच्या सुबक, सुंदर गणेश मूर्तींना आकार दिला.

पर्यावरण संरक्षणात आपलाही हात लागावा म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली हाेती. त्यात ४ वर्षाच्या मुलांपासून चिमुकले कार्यशाळेत सहभागी झाले. मुलांचा उत्साह बघता पालकही गणपती बनवायला बसले. कार्यशाळेत ७०० हून अधिक शाडू मातीचे गणपती तयार केले. आपल्या घरी हीच सुंदर मूर्ती यंदा बसवण्याचा संकल्प या वेळी सहभागींनी घेतला.

संत गाडगेबाबा सेवा समितीच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केले हाेते. सहभागींना माती आणि इतर साहित्य पुरवण्यात आले. सकाळी ११ वाजता कार्यशाळा सुरू झाली. गणेशभक्तांनी उत्कृष्ट गणेश मूर्ती साकाराव्यात यासाठी प्रशिक्षक म्हणून पर्यावरण प्रेमी शरद कोकाटे, रेवती भांगे, पूर्वा बगळेकर, कल्पना राव, दीपाली वाकरे यांनी मार्गदर्शन केले. गणेश मूर्ती निर्मितीला लागणारे संपूर्ण साहित्य आयोजकांच्या वतीने निःशुल्क पुरवण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये सहभागी प्रत्येकाला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

या कार्यशाळेची सुरुवात गणेश वंदना नृत्य करून वैदेही शर्मा, मते यांनी केली.पर्यावरण पूरक गणेश निर्मिती कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संत गाडगेबाबा सेवा समितीचे निशिकांत बडगे, विनोद मापारी, रुपेश कामले, रमेश कदम, नितीन राऊत, प्रवीण रोहणे, गणेश बांगर, विक्रम जानोरकर, ऋषभ सरसे, राहुल माकृवार, नंदकिशोर चिपडे, तुळशीदास खिरोडकार, आशिष कसले, नीलेश मालगे, सुरेंद्र पांडे, शांताराम दांडगे, आकाश सोनोने, जयेश खोडके, आनंद वानखडे, बबलू नायडू, देवा भगत, रवींद्र पांडे यांनी परिश्रम घेतले.

पर्यावरणपूरक उत्सवाचा संकल्प
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनानंतरही कित्येक दिवस पाण्यात विघटित होत नाहीत. त्यामुळे त्यांची विटंबनाही होते. रासायनिक रंगामुळे नद्या, तलाव, विहिरीमधील पाणी प्रदूषित होते. याला रोखण्यासाठीच प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीचा वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे घरोघरी शाडू मातीपासून तयार झालेले गणपती स्थापन होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे तसेच संस्कृतीचे रक्षण होईल, असा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...