आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:विधानसभेला भाजप की शिंदेसेना अकाेल्यावर दावा कुणाचा

अकोला12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून, ‘अकोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकावा,’ यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले. अकोला शहरातील दोन्ही विधानसभा भाजपच्या ताब्यात असताना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेल्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांचे पुत्र विप्लव बाजोरिया हे हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. आमदार विप्लव बाजोरिया यांनी सुद्धा वडिलांबरोबर शिंदे गटात प्रवेश केल्याने विधानसभेच्या आमदारांसोबत आता विधान परिषदेतील आमदारही येणे ही शिंदे गटासाठी जमेची बाजू आहे. गोपीकिशन बाजोरिया हे सध्या आमदार नसले तरी त्यांचे पुत्र हे आमदार आहेतच त्यामुळे त्यांच्या शिंदे गट प्रवेशाला वजन आहे. शिंदे गटात प्रवेश करतेवेळी काही अटीशर्ती नव्हत्या हे जरी बाजोरिया सांगत असले तरी अनेकांना ते पटेलच असे नाही.

बाजोरिया समर्थकांनी प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक अशी पोस्ट केली, त्यामध्ये त्यांनी अकोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असे नमूद केल्याने इकडे जिल्ह्यात बाजोरिया गटाच्या उत्साहाला पारावार उरला नाही. आता हे विधान मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यासाठी करायचे होते की अकोल्यातील पूर्व व पश्चिम मतदारसंघासाठी करायचे होते, हे मुख्यमंत्री आणि बाजोरिया यांनाच ठावूक ! त्यांच्या या पोस्टने शिंदे गटाचा अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघावर दावा असल्याचे मात्र बोलले जात आहे. कारण पूर्वीश्रमी हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाटेला होता.

शिंदे गट अकोला पूर्ववर हक्क सांगणार का?
२०१४ मध्ये युती तुटल्यानंतर अकोला पूर्वच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया होते. त्यात त्यांचा पराभव झाला होता. २००९ पूर्वी हा मतदारसंघ युतीत शिवसेनेसाठी राखीव होता. २०१९ ला मात्र युतीत भाजपकडे गेला होता. त्यावेळी भाजपचे आमदार रणधीर सावरकर दुसऱ्यांदा निवडून आले. सद्यःस्थितीत स्थानिक पातळीवर शिंदे सेना,भाजपची युती झाल्यास बाळापूर हा मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला येईल. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी अकोला विधानसभा मतदारसंघाची तयारीचे सूचक आवाहन केल्याने भाजपकडील अकोला पूर्व मतदारसंघावर शिंदे गट दावा तर करणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...