आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजातील अनिष्ट, रुढी, परंपरांना झुगारत अकोला शहरातील काही विधवांनी मंगळवारी वटपौर्णिमा साजरी केली व वडाच्या झाडाचे पूजन केले. वटपूजन करताना अनेक महिला भावुक झाल्या. तर काहींना अश्रू अनावर झाले.
आजही अनेक मर्यादा
आजही विधवांना प्रथमतः घरातून आणि समाजातून अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. विधवांचे वटपौर्णिमा पूजन समाजात अमान्य आहे. त्यामुळे विधवा महिला वड पूजनासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीत अकोला येथील वीरस्त्री स्व. लताताई देशमुख प्रेरीत स्वामिनी विधवा विकास मंडळाने या प्रवाहाविरुद्ध लढा देत एक अनोख्या उपक्रमाला सुरूवात केली. ही संस्था गेल्या 12 वर्षापासून विधवा महिलांसाठी वटपौर्णिमा पूजनाचे आयोजन करते.
विधवांना दिल्या शुभेच्छा
मंगळवार 14 जून रोजी विधवा सन्मानार्थ झालेल्या वट पूजनाकरिता स्वामिनीच्या सचिव सुनीता डाबेराव व जिल्हाध्यक्षा साधना पाटिल यांच्या नेतृत्वात रेखा नकासकर, कविता तायडे, शिला इवरकर, मीरा वानखडे, सुनिता टाले पाटिल, चेतना गोहेल, स्मिता जंगले, शोभा काहाळे, जयश्री गायकवाड, वर्षा गावंडे, आरती देशमुख, दीपाली देशपांडे, सपना ताथोड या महिलांनी पुढाकार घेत वटपौर्णिमा पूजन करुन विधवांना शुभेच्छा दिल्या.
सामाजिक बंधन झुगारले
चौकटबद्ध समाजातून प्रतिसाद नसताना सुद्धा अनिष्ठ सामाजिक बंधनांना झुगारुन करण्यात येत असलेल्या या समाज सुधारणेबाबत उपस्थित विधवा महिलांनी यावेळी आभार व्यक्त केले. यावेळी अनेक विधवा वडपूजन करताना भावूक झाल्या होत्या.
नवपंरपरा रुजवण्याचे आवाहन
हा स्वामिनी पॅटर्न राज्यभर राबवून याला कायदेशीर मान्यता मिळाल्यास विधवा महिलांवरील सामाजिक दडपण दूर होईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष संजय कमल अशोक यांनी व्यक्त केला. यावेळी विधवांनी आपले मनोगत व्यक्त करुन स्वामिनी संघटनेने समाजाकडे लक्ष न देता परंपरा कायम ठेवावी आणि शासनाकडे पाठपुरावा करावा, असा आग्रह धरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.