आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यामध्ये महालक्ष्मी आरास स्पर्धा:ज्येष्ठ गौरीच्या आगमनाने सर्वत्र मांगल्याचे वातावरण

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘आली आली गौराई, सोन्यारूप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धन धान्याच्या पावलानं,’ असे म्हणत शनिवारी सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन घराघरांमध्ये झाले. गौराईच्या स्वागताप्रसंगी घरातील मंडळींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आता पुढले तीन दिवस महालक्ष्मीचा मुक्काम असेल.

महालक्षमीचे मनोभावे पूजन

रूढीप्रमाणे महालक्ष्मींना साडी नेसवून अलंकारांनी सजवण्यात येते. परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दुध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांचा पायावर कुंकाने स्वस्तिक काढलं जातं. घरात येताना पावलांवर पाऊल ठेवत गौरीचे आगमन करतात. शंख वाजवून गौरीचं घरात आगमन केलं जातं. गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं घरातील देवघरासमोर ठेवून घरात ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होवो समृध्दी येवो अशी प्रार्थना केली जाते. प्रथेप्रमाणे यंदाही रांगोळीने पावळे काढून शुभ मुहूर्तावर थाटामाटात गौरीचे आगमन झाले. गौरींना वेगवेगळे फळे अर्पण करण्यात आली. धान्यांच्या राशी लावल्या गेल्या.

16 पक्वानांचा नैवद्य

माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी,16 चटण्या,16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. फुलोऱ्यासाठी करंज्या, पापड्या, वेण्या, अनारसे, लाडू, चकल्या आदींचे महत्त्व आहे. हल्ली बाजारातही महालक्ष्मीचा नैवद्य विकत मिळतात. सोळा प्रकारच्या भाज्यांचा एक सेट भाजी विक्रेता ठेवतात. मिठाई दुकानदारही सोळ्या प्रकारचे मिष्टांन उपलब्ध करून देतात. तरी घरी तयार केलेल्या नैवद्यांला अधिक मान आहे. त्यामुळे घरोघरी विविध प्रकार तयार करण्याची रेलचेल असते.

उद्याला जेवणाचा कार्यक्रम

तीन दिवस साजरा केल्या जाणार्‍या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते. दुसर्‍या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसर्‍या दिवशी विसर्जन करतात. उद्याला ज्येष्ठा गौरीचे जेवण आहे. यासाठी रविवारी सकाळी भाजी बाजारात प्रचंड गर्दी होणार आहे. महालक्ष्मीला लागणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या खरेदीसाठी नागरिक एकच झुंबड करतात. त्यामुळे भाज्यांच्या किंमतीही वाढलेल्या असणार आहेत. पूजा, आरतीनंतर महालक्ष्मीला जेवणाचे आवाहन करण्यात येईल.

अकोल्यात महालक्ष्मी आरास स्पर्धा

संस्कृती संवर्धन समिती अकोला तर्फे यावर्षी प्रथमच माझी 'महालक्ष्मी आरास स्पर्धा' घेण्यात येत आहे. ही स्पर्धा सर्वासाठी खुली असून स्पर्धकांना घरातील महालक्ष्मीच्या सजावटीचे फोटो 8378808805, 8329184275, 9922998485 क्रमांकावर 6 सप्टेंबरपर्यंत पाठवायचे आहेत. उत्कृष्ट पहिल्या तीन महालक्ष्मी आरास सजावट यांना अनुक्रमे प्रथम बक्षीस 2001 रु. आणि स्मृती चिन्ह, द्वितीय 1501 रु. आणि तृतीय बक्षीस 1001 रुपये प्रदान करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...