आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षांपासून बदललेली पीक पद्धती, निसर्गाचा लहरीपणा यामुळे मातीचे आरोग्य बिघडताना दिसत आहे. माती परीक्षणाच्या माध्यमातून मातीचे आरोग्य जाणून घेऊन ते टिकविण्यासाठी प्रभावी उपाय योजन्याचे आवाहन मृदविज्ञान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ, डॉ. संजय भोयर आणि डॉ. विशाखा डोंगरे यांनी आजच्या जागतिक मृदा दिवसानिमित्त या विषयाकडे लक्ष वेधले.
तज्ज्ञांच्या मते खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ पाणी आणि हवा हे मातीचे मुलभूत घटक आहेत. एखाद्या आदर्श मातीमध्ये हे मुलभूत घटक विशिष्ट आणि संतुलित प्रमाणात म्हणजेच 45 टक्के खनिज पदार्थ, 5 टक्के सेंद्रिय पदार्थ, 25 टक्के पाणी व 25 टक्के हवा या प्रमाणात असावे लागतात.
या घटकांचे हे संतुलित प्रमाण असेच टिकून राहिल्यास मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म यांचे योग्य संतुलन टिकून राहते. अर्थात यामुळेच जमिनीचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. परंतु सध्या या मूलभूत घटकांचे प्रमाण असंतुलित झाले आहे. मातीची सतत धूप होत आहे. त्यामधून जमिनीचा महत्त्वाचा असलेला पिकाला पोषक अन्नद्रव्ये पुरविणारा थर नष्ट होत आहे. निसर्गातील सेंद्रिय चक्र बिघडले आहे. ज्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये मिसळायला हवेत, त्या प्रमाणात ते न मिसळल्यामुळे मातीमधील सेंद्रिय पदार्थांमध्ये घट झालेली आहे. यावरच जमिनीमधील उपयुक्त सुक्ष्म जीवांची संख्या, जमिनीची सुपीकता, जलधारण क्षमता आणि इतर भौतिक गुणधर्म अवलंबून असतात.
जमिनीचे बिघडलेले आरोग्य आणि पर्यायने आपल्याला अपेक्षित पीक उत्पादन तसेच सकस अन्नधान्य मिळत नाही. याचाच परिणाम म्हणून अलीकडच्या काळात जनावरांच्या चाऱ्यामध्ये आणि शेतमालामध्ये मानवास आवश्यक असलेली अन्नद्रव्ये नसल्याने दमा, हृदयविकार, कर्करोग असे विविध प्रकारचे रोग, हाडांशी संबधित शारीरिक विकृती यांना मानवास सामोरे जावे लागत असल्याचे संशोधन समोर आले आहे.
वर्षानुवर्षे एकाच शेतामधून पिके घेत असल्यामुळे त्या शेतामधील मातीमधून उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होत जाते. अतिवृष्टी, पावसातील खंड, सेंद्रिय खतांचा नगण्य किंवा बंद झालेला वापर, रासायनिक खतांचा असंतुलित आणि अंधाधुंद वापर इत्यादी कारणांमुळे सुद्धा मातीमधून पिकाला आवश्यक असणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी आणि असंतुलित होत जाते.
दरवर्षी 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षा लक्षात घेऊन जगाला अन्नपुरवठा करण्याचा पाया असलेल्या मातीच्या सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रे खाद्य व कृषी संघटनेने यंदा माती: जेथे अन्न सुरू होते हे घोषवाक्य ठेवून मातीच्या वाढत्या आव्हानांना जगासमोर मांडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.