आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुकटची पब्लिसिटी:अनधिकृत जाहिरात फलकांमुळे  मनपाला तब्बल 10 कोटींचा फटका

वैभव चिंचाळकर | अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनधिकृत जाहिरात होर्डिंग तसेच अभिनंदन, वाढदिवस, शुभेच्छांचे फलक हे मुख्य चौक, रस्ते, उड्डाण पुलांचे सौंदर्य नष्ट करून शहराच्या विद्रुपीकरणासोबतच अपघातास कारणीभूत ठरत आहेत. १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाला. तेव्हापासून मनपाला जाहिरात शुल्क मिळेनासे झाले असून महिन्याला १.५ कोटी यानुसार आजवर सुमारे १० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

मनपाच्या जागेवरील असोत अथवा खासगी मालकीची इमारत, जागेवर असोत, असे ३०० ही जाहिरात होर्डिंग हे अनधिकृत आहेत. कारण ते परवानगीशिवाय तसेच शुल्क न भरता उभारण्यात आले आहेत. होर्डिंग उभारणाऱ्यांना निर्धारित शुल्क भरून त्यांचे नियमितीकरण करावे लागेल. अन्यथा त्यांचे होर्डिंग जमीनदोस्त करण्यासोबतच त्यांच्याकडून नियमानुसार दंडही वसूल केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे लहान जाहिरातींविरोधात कारवाईचे अधिकार आता पाचही झोनच्या सहायक आयुक्तांकडे देण्यात आले आहेत. असे असले तरी मनपाला न जुमानता या जाहिराती शहरांत सर्वत्र दिसत असल्यामुळे शहराचे रूप भकास झाले आहे. आजवर अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांकडून मनपा ५०० रु. दंड आकारत होती. यापुढे शासनाद्वारे निश्चित दरानुसार अर्थात जाहिरातीचा चौरस फुटातील आकार व दिवस यानुसार दुप्पट दंड वसूल केला जाईल, असे मनपाच्या बाजार व परवाना विभागाने सांगितले.

सर्वच होर्डिंग, जाहिरात फलक अनधिकृत
शहरातील सर्वच होर्डिंग, जाहिरात फलक अनधिकृत आहेत. कारण त्यांच्यापासून महानगर पालिकेला कोणतेही शुल्क मिळत नाही. लवकरच मनपाद्वारे मनपाद्वारे अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई सुरू करणार असून लहान जाहिरात फलकांविरुद्ध झोन स्तरावर कारवाई करण्यास मनपा आयुक्तांचे निर्देश आहेत.
उदयसिंग चव्हाण, अधीक्षक, बाजार व परवाना, मनपा, अमरावती.

दोन वर्षांत ३३ अनधिकृत होर्डिंगवर कारवाई
मनपाद्वारे गेल्या वर्षी २२ आणि यंदा ११ अनधिकृत होर्डींगवर कारवाई करण्यात आली असून काही होर्डिंग हे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. तर काहींवर आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. जाहिरात फलकांसाठी सध्या तात्पुरत्या परवानग्या या झोन स्तरावर दिल्या जात आहेत. परंतु, जे परवानगीविना फलक लावतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे बाजार व परवाना विभागाने स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...