आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी उद्या मतदान:112 उमेदवार रिंगणात, मंगळवारी होणार मतमोजणी

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळ प्रतिनिधींसाठी उद्या, रविवार, 20 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे. तीन जागा अविरोध झाल्याने सिनेटच्या 36 तर दोन जागा अविरोध झाल्याने विद्वत परिषदेच्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी सिनेटमध्ये 12 तर विद्वत परिषदेमध्ये सर्व सहाही जागांसाठी एकास-एक लढत होत आहे.

40 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार

सिनेटच्या 36 जागांसाठी 100 तर विद्वत परिषदेच्या 6 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहे. त्यांना मतदान करण्यासाठी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात 63 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळात मतदान घेतले जाईल. या निवडणुकीत एकूण 40 हजार 554 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी सर्वाधिक 35 हजार 659 मतदार नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल 3 हजार 413 महाविद्यालयीन शिक्षक असून व्यवस्थापनाचे प्रतिनिधी 239 तर प्राचार्य मतदारसंघाची मतदार संख्या 119 असून विद्यापीठ शिक्षकांची संख्या सर्वात कमी 59 आहे.

निवडणुकीचा विषय चर्चेत

प्राचार्य, प्राध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पदवीनंतर वेगवेगळ्या व्यवसाय, नोकऱ्यांमध्ये कार्यरत असलेले नागरिक अशा सर्वांचाच समावेश असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चर्चेत आली असून त्यासाठी सर्वच घटकांनी आपापल्या स्तरावर जोरदार तयारी केली आहे. माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांच्या नेतृत्वातील नागपुर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसीएशन (नुटा) व संघ-भाजपचा प्रभाव असलेल्या शिक्षण मंच या दोन संघटनांमध्ये खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवली जात आहे. याशिवाय प्रा. कमलाकर पायस यांच्या नेतृत्वात जस्टीस पॅनलनेही सदर निवडणुकीत उडी घेतली आहे.

अशी आहे उमेदवारांची विभागणी

सिनेटच्या 36 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत प्राचार्य मतदारसंघात 19, संस्थाचालकांच्या मतदारसंघात 11, प्राध्यापकांच्या मतदारसंघात 31, विद्यापीठ शिक्षकांच्या मतदारसंघात 4 तर नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदारसंघात 35 उमेदवार आहेत. यापैकी प्राचार्य, प्राध्यापक आणि पदवीधरांपैकी प्रत्येकी 10, संस्थाचालकांपैकी सहा तर विद्यापीठ शिक्षकांपैकी तिघांची निवड केली जाणार आहे. प्राचार्यांमधील एसटी संवर्गाची जागा रिक्त आहे. तर विद्यापीठ शिक्षक मतदारसंघात याच संवर्गासाठीची उमेदवार अविरोध विजयी झाली आहे.

मंगळवारी होणार मतमोजणी

सदर निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, 22 नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठीची तयारी विद्यापीठ मुख्यालयी करण्यात आली असून सकाळी 8.00 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. तत्पूर्वी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यातील 63 केंद्रांवरच्या मतपेट्या याठिकाणी आणल्या जाणार आहेत. सदर निवडणुक पसंतीक्रमानुसार होत असल्याने त्यासाठी मतपत्रिका वापरण्यात आल्या असून मतमोजणीवेळी एकच मतपत्रिका किमान दहावेळा हाताळावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...