आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार मैदानात:शिक्षक बँकेच्या 21 संचालकांसाठी 114 उमेदवार मैदानात; आठ जणांनी सोडले मैदान

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीतून केवळ आठ जणांनी मैदान सोडले. त्यामुळे आता २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी ११४ उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. उद्या, मंगळवार, २१ जूनला या उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार असून दुपारनंतर त्यांना चिन्हवाटपही केले जाणार आहे.

सदर निवडणुकीत प्रमुख चार पॅनल असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार त्या-त्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना एकसारखी चिन्हे मिळू शकतात. त्यासाठी बहुदा सर्वच पॅनलने आगाऊ मागणी नोंदविली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केल्याची ‘दिव्य मराठी’ची माहिती आहे. शिक्षक बँक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा सोमवार, २० जून हा शेवटचा दिवस होता. निवडणूक यंत्रणेच्या मते आजपर्यंत केवळ आठ जणांनी माघार घेतली. त्यामुळे उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या १२२ वरुन ११४ वर आली आहे. शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गेल्या १० दिवसांत केवळ दोघांनी माघार घेतली होती. त्यानंतर इतरांनी आज, सोमवारी शेवटच्या दिवशी आपले विड्राल अर्ज सादर केले. माघार घेणाऱ्यांची नावे उद्या प्रकाशित होणार असली तरी त्यांच्यात इतर मागासवर्ग, एससी-एसटी, सर्वसाधारण (तालुकानिहाय मतदारसंघ) आणि महिला संवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. शिक्षक बँकेंच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी आगामी २ जुलैला निवडणूक होत असून ३ जुलै रोजी मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाणार आहे. सदर निवडणुकीसाठी गेल्या २७ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले होते तर उमेदवारी मागे घेण्यासाठी ६ ते २० जून हा कालावधी राखून ठेवण्यात आला होता.

सहकार क्षेत्रातील अग्रणी बँकांपैकी एक असलेली जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक ही सध्या अमरावती शहरच नव्हे तर जिल्हाभरात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. कोट्यवधीचे व्यवहार, अमरावतीसह पाच जिल्ह्यात कार्यक्षेत्र आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना सभासदत्व यामुळे ही बँक बऱ्यापैकी नावारुपास आली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हाच नव्हे तर अख्ख्या पश्चिम विदर्भाचे या बँकेच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...