आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:अमरावती जिल्ह्यातील 115 ग्राप. सदस्य, दोन सरपंचांसाठी 18 मे रोजी निवडणूक; 76 ग्राम पंचायतींमध्ये धूमशान

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या चौदाही तालुक्यात अस्तीत्व असलेल्या 76 ग्रामपंचायतींमधील दोन सरपंच आणि 115 ग्रापं. सदस्यांच्या रिक्त जागांची पोटनिवडणूक आगामी 18 मे रोजी होऊ घातली आहे. त्यासाठी आगामी 25 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील.

या ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी गेल्या महिन्यातच घोषित झाली होती. त्याचवेळी नजिकच्या काळात निवडणूक कार्यक्रम घोषित होईल, असे भाकीतही जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले होते. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने 18 मे रोजी मतदान होत असल्याचे घोषित केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सदर निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने सरपंचासाठी निवडणूक असलेल्या दोन गावांसह इतर 74 गावांतील 102 वार्डांमध्ये निवडणुकीचा ज्वर तापू लागला आहे.

या सर्व ग्रामपंचायतींमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या होत्या. परंतु तरीही विशिष्ट संवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने त्यापैकी काही जागा रिक्त राहिल्या होत्या. दरम्यानच्या काळात काही सदस्य अपात्र ठरल्याने तर काहींनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांची त्यात भर पडली. परिणामी आता 74 ग्रामपंचायत सदस्य व दोन सरपंचांसाठी निवडणूक घेतली जात आहे.

निवडणूक होऊ घातलेल्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक 14 (प्रत्येकी) ग्रामपंचायती चिखलदरा व धारणी तालुक्यातील आहेत. चिखलदरा येथे 26 तर धारणीत 20 रिक्त जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. त्याखालोखाल 12 ग्रामपंचायती दर्यापुर तालुक्यातील असून तेथील रिक्त जागांची संख्या 22 आहे. भातकुली व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी 6 ग्रामपंचायतींच्या अनुक्रमे 6 व 8 जागांसाठी तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या 5 आणि वरुड तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या 7 जागांसाठी निवडणूक होत आहे. याशिवाय अमरावती, चांदूर बाजार व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींमध्ये चार-चार जागांसाठी ही निवडणूक घेतली जाईल. तिवसा व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायतीमध्ये तेवढ्याच रिक्त जागांसाठी मतदान घेतले जाईल. तर चांदूर रेल्वे (3 जागा) व अचलपूर (2 जागा) तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे.

सर्फापूर, आखतवाड्यात सरपंचांसाठी मतदान

सरपंचपदाची निवडणूक होत असलेल्या गावांमध्ये चांदूर बाजार तालुक्यातील सर्फापूर आणि तिवसा तालुक्यातील आखतवाडा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या दोन्ही गावच्या सरपंचांची निवडणूक थेट जनतेतून घेतली जात असल्याने तेथे संपूर्ण गाववासियांना मतदान करावे लागणार आहे. सर्फापुरात 432 महिला आणि 445 पुरुष मिळून 877 तर आखतवाडा येथे 423 महिला व 475 पुरुष मिळून 898 मतदार आहेत.