आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:12 पं. स. च्या सभापतिपदाची आरक्षण सोडत आज ; सकाळी ठिक 11 वाजता होणार जाहीर

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील चौदापैकी १२ पंचायत समित्यांच्या सभापतिपदांचे आरक्षण उद्या, गुरुवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सकाळी ११ वाजता सोडत काढली जाईल. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोडतीची संपूर्ण तयारी निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या कार्यालयाने पूर्ण केली असून, जिल्ह्यातील नागरिकांच्या उपस्थितीत ही सोडत काढली जाईल.

यावेळी अमरावती जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता असून बहुतेक राजकीय पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. आदिवासीबहुल मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन पंचायत समित्या अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यामुळे उर्वरित डझनभर पंचायत समित्यांचे यापुढील सभापती कोणत्या संवर्गाचे असतील, हे राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या सूत्राच्या आधारे सोडतीद्वारे निश्चित केले जाईल.

यामध्ये मोर्शी, वरुड, चांदूरबाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, अमरावती, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व तिवसा या बारा पंचायत समित्यांचा समावेश आहे. या पंचायत समित्यांमध्ये गेल्या तीन कालखंडांसाठी कोणत्या संवर्गाचे आरक्षण होते. त्याचा आढावा घेऊन चक्रानुक्रमे पुढील आरक्षण कोणते असावे, याची निश्चिती केली जाते. त्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून दीपक देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आवश्यक तो गृहपाठ केला आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यामते जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत सकाळी ठिक ११ वाजता सोडत सुरु होईल. धारणी आणि चिखलदरा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती संवर्गासाठी आरक्षित असून त्यापैकी एक जागा महिला सदस्यासाठी राखीव ठेवली जाणार आहे.

बारापैकी तीन पं.स. तील पदे अनुसूचित जातीसाठी जिलह्यातील १२ पंचायत समित्यांपैकी तीन पदे अनुसूचित जातीसाठी (एससी), दोन अनुसूचित जमातीसाठी (एसटी) तर एक पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (नामाप्र) आरक्षित ठेवावयाचे असून इतर सहा पंचायत समित्यांचे सभापतीपद खुले ठेवण्यात यावे, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. ओबीसींचा टक्का घटवल्यानंतर आगामी काळात होणाऱ्या या निवडणुकांमध्येही नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या वाट्याला केवळ एकच पंचायत समिती येत असून जिल्ह्यातील एकूण १४ जागांपैकी निम्म्या जागा महिलांच्या वाट्याला येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...