आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींमधील वॉर्डांचे आरक्षण सोमवारी ठिकठिकाणी पार पडलेल्या सोडतीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले. सर्व अकराही स्थानिक स्वराज्य संस्था मिळून जिल्ह्यात २५७ नगरसेवक निवडून येणार आहेत. यापैकी १३० जागा महिलांसाठी राखीव असून, यात सर्व संवर्गाचा समावेश आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट झाला असल्याने त्या संवर्गाचे वेगळे आरक्षण ठरवण्यात आले नाही. परंतु या संवर्गाला सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवता येणार आहे. आरक्षण निश्चितीनंतर ‘दिव्य मराठी’ने वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी संवाद साधला. काही वॉर्डांच्या आरक्षणात बदल झाल्यामुळे तुमच्या पक्षातील दिग्गजांची अडचण होईल का, या प्रश्नाच्या उत्तरात सर्वांनी आमच्याकडे पुरुष, महिला असे दोन्ही पर्याय असून ठिकठिकाणची सत्ता कायम राखण्यासोबतच नव्या ठिकाणीही सत्ता असेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झालेल्या समीकरणानुसार एकूण २५७ जागांमध्ये ३३ ठिकाणी अनुसूचित जाती (एससी) तर १३ ठिकाणी अनुसूचित जमातीचे (एसटी) उमेदवारच लढू शकतील, अशी स्थिती असून, यामध्ये निम्म्या महिला असणे अनिवार्य आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या निर्देशानुसार ठिकठिकाणचे प्रशासक (एसडीओ) आणि मुख्याधिकारी (सीओ) यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी वॉर्ड आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी त्या-त्या गावचे राजकीय पुढारी आणि इच्छुक नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यातील ‘अ’ वर्गात मोडणाऱ्या अचलपूरसह ‘ब’ वर्गातील अंजनगाव सुर्जी व वरुड तसेच चांदूर बाजार, दर्यापूर, शेंदुरजनाघाट, मोर्शी, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे या नऊ नगरपालिका आणि धारणी व नांदगाव खंडेश्वर या दोन नगरपंचायतींसाठी आज सोडत काढण्यात आली. अकरापैकी सात ठिकाणची सोडत सकाळी ११ वाजता, तर प्रत्येकी दोन ठिकाणची सोडत दुपारी २ व ४ वाजता काढण्यात आली.
अचलपूर नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये २० प्रभागात ४१ उमेदवारांसाठी ही सोडत काढली. त्यापैकी २१ जागा सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.