आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढतीचे चित्र:257 गावांच्या सरपंचपदासाठी 1300; तर ग्रा. पं. सदस्यांसाठी 4,847 उमेदवार

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद निवडणुकीची रिहर्सल समजल्या जाणाऱ्या २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची खरी रणधुमाळी गुरुवारपासून सुरू होत आहे. आज, बुधवार, ७ डिसेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. वृत्त लिहिस्तोवर जिल्ह्यातील चौदापैकी सहा तालुक्यांची स्थिती स्पष्ट झाली असून तेथे चार सरपंच व ८५ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्व ग्रामपंचायती मिळून जिल्ह्यात २५७ सरपंचपदासाठी १३००, तर २ हजार ९७ ग्रा. पं. सदस्यांसाठी ४,८४७ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.

माघारीनंतर स्पष्ट झालेल्या चित्रानुसार मोर्शी तालुक्यातील डोमक (कोळविहीर)चे सरपंचपद भाजपच्या वाट्याला आले असून वरुड तालुक्यातील डवरगाव व मोर्शी तालुक्यातील बेलोना येथील सरपंचपद काँग्रेससोबत निवडणूक लढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्याचवेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सरपंचाची एक आणि सदस्यांच्या ४१ जागा अविरोध विजयी झाल्या आहेत.

‎भातकुली तालुक्यात सदस्यांच्या ३० जागा अविरोध‎ निवडल्या गेल्या असून धामणगाव रेल्वे‎ तालुक्यातील ५ आणि तिवसा तालुक्यातील ९‎ सदस्यही अविरोध विजयी झाले आहेत. निवडणूक‎ विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‎ अचलपूर तालुक्यातील सरपंचांच्या १०० पैकी २७,‎ तर सदस्यांच्या ४३४ उमेदवारांपैकी ५२ जणांनी‎ माघार घेतली.

त्याचवेळी भातकुली तालुक्यातील‎ सरपंचाच्या ४९ पैकी ७ आणि सदस्यांच्या २१३‎ उमेदवारांपैकी १९ जणांनी माघार घेतली. चांदूर‎ बाजार तालुक्यातील सरपंचाच्या १०४ पैकी ३०‎ जणांनी माघार घेतली असून, सदस्यपदासाठीच्या‎ निवडणुकीतून ६१ जणांनी मैदान सोडले आहे. येथे‎ सदस्य पदासाठी ४८२ जणांनी अर्ज दाखल केले‎ होते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या‎ धामणगाव रेल्वे तालुक्यात सरपंचाच्या ७ आणि‎ सदस्याच्या ५३ जागांसाठी निवडणूक होत आहे.‎ यासाठी येथे अनुक्रमे ३४ आणि ११२ जणांनी‎ उमेदवारी दाखल केली होती.

त्यापैकी सरपंचांच्या‎ ७ आणि सदस्यपदासाठीच्या ११ जणांनी माघार‎ घेतली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७ जणांनी‎ सरपंचपदाचे, तर २७ जणांनी सदस्यपदाचे मैदान‎ सोडले. त्याचवेळी वरुड तालुक्यात ११ जणांनी‎ सरपंचाच्या निवडणुकीतून माघार घेतली असून‎ सदस्यपदाच्या निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांची‎ संख्या १७ आहे. आगामी १८ डिसेंबर रोजी‎ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. बुधवारी‎ माघारीनंतर सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचेही‎ वाटप करण्यात आले. त्यामुळे सरपंच व‎ सदस्यपदांचे उमेदवार खऱ्या अर्थाने गुरुवारपासून‎ कामाला लागणार आहेत. सदर ग्रामपंचायतींच्या‎ निवडणुकीची घोषणा गेल्या २ नोव्हेंबर रोजी‎ करण्यात आली होती.त्याच दिवसापासून या सर्व‎ गावांमध्ये आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर २८‎ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान उमेदवारी अर्ज‎ दाखल केले गेले.‎

अशी आहे ग्रामपंचायतींची संख्या : सर्वाधिक‎ २६ ग्रामपंचायती आदिवासीबहुल मेळघाट‎ क्षेत्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा‎ तालुक्यातील आहेत. तर सर्वात कमी ७‎ ग्रामपंचायती धामणगाव रेल्वे तालुक्यात आहेत.‎ याशिवाय दर्यापूर तालुक्यातील २५, चांदूरबाजार व‎ मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी २४, धारणी, अचलपूर‎ व वरुड तालुक्यातील प्रत्येकी २३, नांदगाव‎ खंडेश्वर व चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी १७,‎ अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १३, तिवसा व‎ अमरावती तालुक्यातील प्रत्येकी १२ आणि‎ भातकुली तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींमध्ये ही‎ निवडणूक होत आहे.

काँग्रेसचे निवडणुकीवर लक्ष
ही निवडणूक पक्ष चिन्ह वा नावावर लढली जात नाही. परंतु प्रत्येक गावात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे काँग्रेस पक्षाने आधीपासूनच या ग्रा. पं. निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आमच्या काही जागा आधीच बिनविरोधही विजयी झाल्या आहेत. निवडणुकीत आमचेच वर्चस्व राहणार आहे.- गिरीश कराळे, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस कमीटी, अमरावती.

विजय भाजपचाच होणार
माघारीनंतरचे संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु भाजपने काही ग्रा. पं. अविरोध जिंकल्या असून त्या भांडवलासह भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे. उद्या, गुरुवारपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. अविरोध जिंकलेल्यांची संख्या आणखी वाढेल. विजय आमच्याच बाजूने असेल.- निवेदिता चौधरी, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, अमरावती.

ग्रामीण भाग शिवसेनेचा गड
ग्रामीण भाग हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गड राहिला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाला नेहमीच ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळतो. यावेळीही हे चित्र कायम राहिल. ग्रा. पं. निवडणुकीच्या अनुषंगाने सरपंच व सदस्यपद जिंकण्यासाठी आम्ही तिन्ही जिल्हा प्रमुखांनी संयुक्त बैठका घेतल्या. जिंकण्याची पूर्ण तयारी झाली आहे.- सुनील खराटे, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...