आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी:अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात 522 हेक्टरमधील पिकांचे नुकसान 13.6 मिमी पावसाची नोंद

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 522 हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, कांदा, हरभरा, मका, मिरचीसह निंबू, आंबा व संत्रा आदी फळपिकांना अवकाळीचा फटका बसला. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील सहा तालुके बाधित झाले असून गेल्या चोवीस तासांत 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी आज, शनिवारी राज्य सरकारला जिल्ह्यातील नुकसानाचा अहवाल पाठविला. त्यानुसार जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याच दुर्घटनेत दोन शेतमजूर जखमी झाले आहेत. याशिवाय जिल्ह्यात दोन मोठी जनावरे दगावली असून काही गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या घटनांमध्ये एक घर पूर्णत: जमीनदोस्त झाले असून इतर गावांमधील 112 घरांची अंशत: पडझड झाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वाधिक 288 हेक्टर क्षेत्रातील पिके खराब झाली. त्याखालोखाल अमरावती तालुक्याच्या ग्रामीण भागातील 160 हेक्टर क्षेत्रातील पिके खराब झाली असून भातकुली तालुक्यातील 34.80 हेक्टर क्षेत्रातील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 28 हेक्टर तर दर्यापुर तालुक्यातील 12 हेक्टर क्षेत्रातील पिक अवकाळी पावसाचा बळी ठरले. वीज पडून मजुराच्या मृत्यूची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील असून याच तालुक्यातील अन्य दोन शेतमजूर या घटनेत जखमी झाले.

मार्चमध्येही नुकसान

गेल्या मार्च महिन्यात 16 ते 19 तारखेदरम्यान जिल्ह्यात असाच अवकाळी पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यावेळी 2 हजार 663 शेतकऱ्यांचे 1 हजार 369.52 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यासाठी 2 कोटी 38 लाख 53 हजार 630 रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. यामध्ये खरीप व रब्बी पिकांसह फळपिकांच्या नुकसानाचाही समावेश आहे.