आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत त्यानंतर पदवीधर निवडणूक आचारसंहितेमुळे दोन महिन्यांपासून प्रोत्साहन अनुदानाची यादी रखडली होती. आता दुसरी यादी जिल्ह्यास प्राप्त झाली. यामध्ये फक्त २ हजार ६११ शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रतिक्षेतील १३ हजार ६८३ शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे. तीनपैकी दोन वर्षे नियमित पीक कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. यापूर्वी तीन वर्षांपासून कित्येकदा फक्त घोषणा करण्यात आलेल्या होत्या, आता प्रत्यक्ष लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे.
जिल्ह्यात १.८० लाख शेतकऱ्यांना ९०० कोटींची कर्जमाफी देण्यात आलेली आहे. यामध्ये नियमित खातेदारांना कोणताही फायदा झालेला नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी होती. त्यामुळे शासनाने ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय या सरकारने कायम ठेवलेला आहे. परंतु, निवडणूक आचारसंहितातेचा फटका लाभार्थी शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्ह्यातील ३२ हजार ४८६ पात्र शेतकऱ्यांपैकी २ हजार ६११ शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त झाले आहेत. अजूनही १३ हजार ६८३ शेतकऱ्यांना अनुदान खात्यात जमा न झाल्याने त्यांची निराशा झाली आहे. गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात अतिपावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच आता शासकीय दिरंगाईचा फटका बसत आहे.
योजनेची जिल्ह्यातील अशी आहे स्थिती प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यातील ३२ हजार ४८६ शेतकरी पात्र ठरले आहेत. त्याच्या तुलनेत पहिल्या यादीत १६ हजार २ आणि दुसऱ्या यादीत २ हजार ६११ शेतकऱ्यांना खात्याला विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेला आहे. यापैकी ज्या खातेदारांनी आधार लिंकची प्रक्रिया केलेली आहे. अशा १४ हजार ३४५ शेतकऱ्यांना ६५.१० कोटींचा लाभ आतापर्यंत मिळालेला आहे. अद्याप १३ हजार ६८३ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३२ हजार ४८६ शेतकरी खातेदार पात्र ठरले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.