आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे रस्ते उखडले:रस्ते दुरुस्तीसाठी 139 कोटी रुपये लागणार; हानीला जबाबदार कोण

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४५० कि.मी.रस्ते उखडले असून लहान-मोठे १४४ पूल तुटले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे १३९ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. शासन हा निधी देईलही. परंतु, या नुकसानासाठी जबाबदारी निश्चित होणेही आवश्यक आहे. कंत्राटदार, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), मनपा बांधकाम विभागालाही याबाबत विचारणा व्हायला हवी. संबंधितांवर जबाबदारी निश्चित झाली तरच आपत्तीनंतर रस्त्यांच्या दुरुस्तीवर होणारा शासनाचा खर्च टळेल.

रस्ते व पुलांचे कंत्राट देताना त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ही कंत्राटदाराकडे असते. तसेच कामाचा दर्जा उत्तम राहावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी काळजी घेणेही आवश्यक असते. परंतु, १०० पैकी १० ते १५ टक्के प्रकरणांमध्ये निष्काळजीपणा झाल्याचे नाकारता येणार नाही, असे जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी, मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. रस्ते व पुलांच्या श्रेणीनुसार कंत्राटदाराकडे त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी एक ते ५ वर्षांपर्यंत असते. त्यानुसार बहुतांश उखडलेले रस्ते व तुटलेल्या पुलांच्या देखभाल, दुरुस्तीची मुदत संपुष्टात आली होती. त्यावर करारनाम्यातील मुदतीपर्यंत ‘मलमपट्टी’ करण्यात आली. त्यानंतर तिकडे कोणाचेही लक्ष नव्हते. अखेर अतिवृष्टीने त्यांचे नुकसान झाले. परिणामी दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपून काढल्यामुळे रस्ते व पुलांचे नुकसान झाले. ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांचे ३८९.५ कि.मी., पीडब्ल्यूडीचे ५० कि.मी. तर मनपाचे १०.५ कि.मी. रस्त्यांचे नुकसान झाले आहे. जि. प.चे १३६ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे ८ पुल तुटले आहेत. अडथळारहित वाहतुकीसाठी त्यांचीही दुरुस्ती आवश्यक आहे.

जि. प., पीडब्ल्यूडी, मनपाद्वारे शासनाकडे १३९ कोटी रु.चे रस्ते व पुल दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. यात जि. प.ने १३१.५ कोटी, पीडब्ल्यूडीने ६ कोटी, मनपाने १.५ कोटी रुपये मागितले आहेत.

यंदा शासनाकडे लवकरच प्रस्ताव सादर केला
अतिवृष्टीमुळे पीडब्ल्यूडीचे आठ रस्ते व तसेच काही पूल खराब झाले आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. यावेळी लवकर प्रस्ताव पाठवले. -सुनील थोटांगे, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी, अमरावती.

आवश्यकता असल्याने नुकसान भरपाई मागितली
मुसळधार पावसामुळे उखडलेल्या शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता असल्याने शासनाकडे तत्काळ प्रस्ताव पाठवले असून, काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदाही मागवल्या आहेत. -रवींद्र पवार, शहर अभियंता, मनपा.

बातम्या आणखी आहेत...